नवी दिल्ली -पूर्व लडाखमध्ये भारत आणि चीनचे सैनिक आमने-सामने उभे ठाकल्यानंतर सुरू झालेल्या चर्चेच्या फेऱ्या कायम आहेत. सीमावादावर चर्चा करण्यासाठी भारत-चीन सैन्यात आज चर्चेची बारावी फेरी सुरू आहे. मोल्डोमध्ये सकाळी 10.30 वाजता चर्चा सुरू झाली आहे. चीनने पूर्व लडाखमध्ये घुसखोरी केल्याचे वृत्त आले होते. या पार्श्वभूमीवर या बैठकीला जास्त महत्त्व आहे. गलवान खोऱ्यातील सीमावाद मिटला असला तरी भारत-चीन सीमेवर अनेक ठिकाणांवरून मतभेद आहेत.
पँगाँग सरोवराच्या दक्षिण आणि उत्तर सीमेवरून भारत आणि चीनचे सैन्य पूर्णपणे मागे हटले आहे. मात्र, तरीही इतर अनेक मुद्दे वादाचे राहीले आहेत. त्यावरच चर्चा होणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली. मोल्डो येथे शनिवारी सकाळी साडेदहा वाजता बैठक सुरू झाली आहे. हॉट स्प्रिंग आणि गोगरामधील स्थितीवर भारत आणि चीनमध्ये चर्चा होत असल्याचे भारतीय सैन्य दलातील सुत्राने सांगितले. भारत चीनमध्ये सीमावाद सुरू झाल्यानंतर आत्तापर्यंत लष्करी, राजनैतिक आणि विशेष प्रतिनिधी स्तरावर अनेक चर्चा झाली आहे.
भारताचे 20 जवान शहीद -
15 जून 2020 रोजी गलवान खोऱ्यात झालेल्या धुमश्चक्रीत भारतीय सैन्यदलाचे 20 जवान शहीद झाले होते. भारत-चीन सैन्यादरम्यानचा गेल्या चार दशकांतील हा सर्वात हिंसक तणाव असल्याचे यानंतर सांगितले गेले. भारताने या घटनेनंतर लगेचच आपले सैनिक शहीद झाल्याची माहिती जारी केली होती. मात्र चीनने याविषयी कसलिही अधिकृत माहिती जारी केलेली नव्हती. मात्र, काळी काळानंतर चीनने आपले जवान ठार झाल्याची कबुली देत जवानांची माहितीही सार्वजनिक केली होती. दरम्यान, 10 फेब्रुवारी रोजी प्रकाशित केलेल्या एका वृत्तात रशियन वृत्तसंस्था टासने गलवान खोऱ्यातील धुमश्चक्रीत चीनचे 45 जवान ठार झाल्याचे म्हटले होते.