नवी दिल्ली -नवीन कृषी कायद्यांविरोधात गेल्या अनेक दिवसांपासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. 26 मे रोजी या आंदोलनाला सहा महिने पूर्ण होतील. यानिमित्ताने संयुक्त किसान मोर्चाने हा दिवस 'ब्लॅक डे' म्हणून पाळण्याचे ठरवले आहे. विशेष म्हणजे, या आंदोलनाला काँग्रेससह 12 विरोधी पक्षांनी पुन्हा एकदा पाठिंबा दर्शविला.
किसान मोर्चाच्या समर्थनार्थ 12 विरोधी पक्षांनी निवेदन जारी केले आहे. या निवेदनात 12 मे रोजी लिहिलेल्या पत्राचा उल्लेखही आहे. या पत्रामध्ये कृषी कायदे मागे घेण्याची मागणी करण्यात आली आहे. कृषी कायदे मागे घ्यावेत, असे या पत्रात म्हटले आहे. यातून शेतकरी दिल्लीची सीमा सोडून परत जातील आणि कोट्यावधी शेतकरी कोरोना साथीच्या आजारापासून वाचतील, असेही म्हटलं आहे.
या पक्षांनी दिला शेतकऱ्यांना पाठिंबा -
सोनिया गांधी (काँग्रेस) एचडी देवगौडा (जद-एस) शरद पवार (राष्ट्रवादी काँग्रेस) ममता बॅनर्जी (टीएमसी) उद्धव ठाकरे (शिवसेना) एम के स्टालिन (द्रमुक) हेमंत सोरेन (जेएमएम) फारूक अब्दुल्ला (जेकेपीए) अखिलेश यादव (समाजवादी पार्टी) तेजस्वी यादव (आरजेडी) डी राजा (भाकप) सीताराम येचुरी (माकप) यांनी शेतकऱ्यांना पाठिंबा दिला आहे.
ब्लॅक डे आंदोलनासाठी आवाहन...
संयुक्त किसान मोर्चाने या दिवशी देशभरातील शेतकऱ्यांना दिल्लीच्या सीमेवर येण्याचे आवाहन केले आहे. "जिंदा है, तो दिल्ली आजा" असे घोषवाक्य या आंदोलनासाठी तयार करण्यात आले आहे. या घोषवाक्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आंदोलनास येण्याचे आवाहन करण्यात येत आहे. ज्यांना शक्य आहे त्यांनी सीमेवर यावे, अथवा आपल्या घरुनच या आंदोलनाला पाठिंबा द्यावा, असेही ऑल इंडिया किसान संघर्ष समन्वय समितीचे सह-संयोजक अविक शाह यांनी स्पष्ट केले आहे. आपल्या घरांवर, दुकानांवर किंवा कार्यालयांवर काळे झेंडे लाऊन या आंदोलनाला पाठिंबा दाखवावा, असे ते म्हणाले.