लाहौल स्पिती : सध्याच्या काळात डेस्टिनेशन वेडिंगचा ट्रेंड वाढला आहे. वधू तसंच वर त्यांच्या आयुष्यातील सर्वात खास दिवस अविस्मरणीय बनवण्यासाठी डेस्टिनेशन वेडिंग करताना आपल्याला दिसून येतात. गुजरातमधील अशाच एका जोडप्यानंही त्यांचं लग्न अविस्मरणीय करण्यासाठी हिमाचलच्या लाहौल स्पिती जिल्ह्यात डेस्टिनेशन वेडिंग करताना दिसून आलंय. लाहौल स्पिती जिल्ह्यात सध्या तापमान उणे 25 ते 30 अंशांवर पोहोचलं आहे. अशा स्थितीत डेस्टिनेशन वेडिंग करणं जिवावर बेतण्यासारखच आहे. लाहौल स्पितीला बर्फाचं वाळवंट देखील म्हटलं जातं.
हिमवृष्टीत घेतले सात फेरे : जोडप्यासाठी लाहौल-स्पिती जिल्ह्यातील मोरंग गावात हिमवृष्टीदरम्यान डेस्टिनेशन वेडिंगसाठी मंडप सजवण्यात आला. जिथं गुजरातमधील एका जोडप्यानं त्यांचं वेडिंग संस्मरणीय बनवलं. दोघांनी हिंदू रितीरिवाजाप्रमाणे मंत्रोच्चारासह सात फेरे घेतले. याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
गावकऱ्यांना आश्चर्याचा धक्का : लाहौल स्पिती जिल्ह्यात दरवर्षी हिवाळ्यात हिमवृष्टी होते. या कालावधीत इथं फारच कमी वाहतूक होत असते. स्थानिक लोक देखील अत्यंत आवश्यक असेल तेव्हाच घराबाहेर पडतात. सोमवारी मोरंग गावात बर्फात सजवलेला मंडप पाहिल्यावर गावकऱ्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. सुवातीला गावकऱ्यांना वाटलं की, गावाता एखाद्या चित्रपटाचं चित्रीकरण होत आहे. पण चौकशी केल्यावर येथे लग्न होत असल्याचं समोर आलं, असं गावचे स्थानिक रहिवासी कलजंग यांनी सांगितलं.
"हे गुजरातचे काही लोक होते, जे मोरंग गावात हिमवृष्टीमध्ये मंडप सजवून जोडप्याचा विवाह सोहळा पूर्ण करत होते. हिंदू रितीरिवाजानुसार मंत्रोच्चार करून विवाहसोहळा पार पडला." - कलजंग, शिक्षक
काय आहे व्हिडिओमध्ये : एक मिनिटापेक्षा जास्त असलेल्या या व्हिडिओमध्ये बर्फानं वेढलेल्या पर्वतांमध्ये काही वाहनं उभी असल्याचं दिसत आहे. वधू कारमधून बाहेर पडताच तिचे फोटो काढताना कॅमेरामन दिसत आहे. तसंच लग्नासाठी बर्फात सजवलेला मंडप दिसून येतोय. नंतर व्हिडिओमध्ये वधू मंडपाकडं येताना दिसत आहे. मंडपाच्या आजूबाजूलाही काही लोक दिसतात. यापैकी काही वधू-वरांचे मित्र, नातेवाईक असल्याचं दिसतंय. तर काही स्थानिक लोकही तिथं उभे आहेत. थंडीमुळं डोक्यापासून पायापर्यंत सर्वजण लोकरीचे कपडे, जॅकेट, टोप्या घातलेले दिसून येत आहेत.
प्रेयसीच्या आग्रहामुळं लग्न स्मरणीय : हिमवृष्टीदरम्यान मंडप सजवून लग्नाचे विधी पार पाडावेत यावर प्रेयसी ठाम होती, असा दावा केला जात आहे. त्यासाठी पूर्ण तयारीनिशी वऱ्हाडी मंडळी गुजरातहून स्पितीच्या मोरंग गावात पोहोचली. त्यानंतर तिथं मंडप सजवण्यात आला. लाहौल स्पितीचे जिल्हा मुख्यालय असलेल्या काझापासून मोरंग गाव सुमारे 20 किलोमीटर अंतरावर आहे. हे क्षेत्र समुद्रसपाटीपासून सुमारे 12 हजार फूट उंचीवर आहे. या काळात येथे हिमवृष्टी होत असल्यामुळं तापमान उणे 25 ते 30 अंशांपर्यंत पोहचतं.
डेस्टिनेशन वेडिंगचं युग : काझा येथील जनसंपर्क विभागाचे सहायक अधिकारी अजय बनियाल यांनीही हा व्हिडिओ त्यांच्या सोशल मीडिया पेजवर पोस्ट केला आहे. अजय बनियाल म्हणाले, "आजकाल डेस्टिनेशन वेडिंगचं युग सुरू आहे. जोडपी लग्नासाठी नवीन ठिकाणं निवडत आहेत. अशा परिस्थितीत स्पिती व्हॅली हे वेडिंग डेस्टिनेशनसाठीही एक योग्य ठिकाण आहे." लाहौल स्पितीमध्ये हिमवृष्टीमुळं जनजीवन विस्कळीत झालं आहे. हिमवृष्टीमुळं खोऱ्यातील तापमानात दररोज घट होत आहे. अशा परिस्थितीत दैनंदिन कामंही आव्हानापेक्षा कमी नाहीत. अशा वातावरणात या डेस्टिनेशन वेडिंगचा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे.
हे वाचलंत का :