पुणे - सद्यस्थितीत कोरोना रुग्णांना हॉस्पिटलमध्ये जागा मिळत नाही. अशात दौंड येथील रेल्वेचे रुग्णालय बंद असल्याची बाब शिवसेना पदाधिकाऱ्यांनी महाराष्ट्र विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांना कळविली होती. त्यानंतर डॉ. गोऱ्हे यांनी सोलापूर डीएमआर यांच्याशी पत्र व्यवहार केला आणि दौंड रेल्वेचे रुग्णालय दौंड येथील नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्याची विनंती केली. रेल्वे प्रशासनाने विनंती मान्य करून हे हॉस्पिटल शासनास वापरण्यासाठी दिले. त्यामुळे दौंड तालुक्यातील रुग्णांना याचा फायदा होणार आहे.
कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे हॉस्पिटल कमी पडत आहेत. त्यामुळे विविध ठिकाणी हॉस्पिटल सुरू करण्याचा विचार प्रशासनाकडून होत आहे. पुणे जिल्ह्यात देखील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. काल (शुक्रवारी) दौंड येथील रेल्वे रुग्णालय शासनास वापरण्यासाठी देण्यात आले आहे. याबाबत तहसीलदार संजय पाटील आणि मंडळ अधिकारी सुनील जाधव यांना ताबा घेण्याचे पत्र प्राप्त झाले. त्यानुसार हॉस्पिटल ताब्यात घेण्याची कार्यवाही करणार असल्याचे दौंडच्या तहसीलदारांनी डॉ. गोऱ्हे यांना दूरध्वनीवरून सांगितले. तसेच दौंड उपविभागीय अधिकारी गायकवाड यांच्याशी चर्चा करून हे हॉस्पिटल सरकारी यंत्रणा किंवा खाजगी यंत्रणेला देण्याबाबत आवश्यक कार्यवाही सुरू असल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितले. तसेच ज्या खासगी संस्था हे हॉस्पिटल चालविण्यासाठी इच्छुक असतील, त्यांनी संपर्क साधण्याचे आवाहन देखील तहसीलदार पाटील यांनी केले.