परभणी - प्रेम प्रकरणातून खून झालेल्या तरुणाचा मृतदेह तपासणीसाठी पूर्णा पोलिसांनी तब्बल ४० दिवसांनी बाहेर काढला. आरोपींनी खून केल्यानंतर मृतदेह पुरलेलेल्या जागेवर जाऊन पोलिसांनी मयत तरुणाचे मृतदेहही तपासासाठी आज (सोमवारी) उकरून काढले. हा तरूण परळी येथील असून या प्रकरणात आणखी चार आरोपी आहेत. पोलीस या आरोपीसह प्रेम प्रकरणातील मुलीचाही शोध घेत आहेत. याप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना गजाआड केले आहे.
परळी येथे घराशेजारी राहणाऱ्या तरुण-तरुणीमध्ये प्रेमसंबंध बहरत गेले. घरच्यांच्या विरोधामुळे दोघे सैराट (पळून) गेले. परंतु घरच्यांनी मनधरणी केली आणि प्रेमी जोड्याला लग्न लावण्याचे आश्वासन दिल्याने दोघेही घरी परतले. परंतु त्यानंतर मुलीकडील नातेवाईकांनी कट रचला व मुलाचा खून केला, असा आरोप या प्रकरणात लावण्यात आला आहे.
दरम्यान, परळी (वै.) येथील अजय अशोक भोसले (वय १७, रा.गौतमनगर) याचे १७ फेब्रुवारीला पूर्णा रेल्वेस्थानक परिसरातून ६ जणांनी अपहरण केले. मुलाची आई मंगलबाई अशोक भोसले यांच्या फिर्यादीवरून परळी (वै.) येथील संभाजीनगर पोलीस ठाण्यात ३ मार्चला आरोपी शक्तीसिंग बाबरी व बच्चनसिंह बावरी यांच्यासह ६ जणांवर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.
या गुन्ह्यातील आरोपींच्या शोधासाठी पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय यांच्या आदेशावरून पोलीस निरीक्षक सुभाष राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक तयार करण्यात आले. परळी रेल्वे स्थानक परिसरातून फौजदार पवार यांच्या पथकाने १८ मार्चला शक्तीसिंग बावरी व बच्चनसिंग बावरी यांना ताब्यात घेऊन गजाआड केले. पूर्णा न्यायालयाने सुनावलेल्या ६ दिवसांच्या पोलीस कोठडीतील या २ आरोपींनी पूर्णा पोलिसांना सांगितले, की अजय भोसले याने आमच्या बहिणीस प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिला काही महिन्यापुर्वी पळवून नेले होते. त्यामुळे आमचा त्याच्यावर राग होता. आम्ही त्याचा कायमचा काटा काढण्यासाठी शहरात तुमचे लग्न लावून देतो म्हणून बोलावून घेतले. त्यानंतर या दोघांना घेऊन दोन आरोपी व त्यांचे चार साथीदार हे परळी येथे आले. त्यानंतर ६ जणांनी मिळून अजय भोसले यांस काठी मारुन त्याचा खून केला व त्याचे प्रेत परळी शहरातील थर्मल कॉलनीच्या संरक्षक भिंतीजवळ पुरले.
या कबुली जबाबनंतर २५ मार्चला पूर्णा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुभाष राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार चंद्रकांत पवार व त्यांच्या साथीदारांनी आरोपीस सोबत घेऊन परळी गाठली व खड्ड्यात पुरलेला मृतदेह 40 दिवसांनंतर बाहेर काढले. त्याच ठिकाणी परळी येथील तहसीलदार, वैद्यकीय अधिकारी पोलिस यांच्या समोर मृतदेहाची उत्तरीय तपासणीनंतर नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. त्यानंतर आरोपी शक्तीसिंग बावरी व बच्चनसिंग बावरी यांना पूर्णेत आणून त्यांच्या विरोधातील गुन्ह्यात वाढ केली. आरोपींना पुन्हा पूर्णा प्रथमश्रेणी न्यायालयासमोर हजर करण्यात आले असून त्यांची पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली.