येवला (नाशिक) - कोरोनाकाळात सर्वांनी माणुसकीच्या भावनेतून व सामुहिक जबाबदारीने काम करावे. तसेच प्रशासनाने जारी केलेल्या निर्बंधांचे नागरिकांकडून काटेकोरपणे पालन होत नसल्याने कोरोनाबधितांची संख्या अशीच वाढत राहिल्यास येत्या काही दिवसात लॉकडाऊन अटळ आहे, असे राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले.
संसर्ग पसरू नये, यासाठी प्रशासनाने नियोजन करावे -
पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले, गृहविलगीकरणात असणाऱ्या रूग्णांचा शोध घेऊन त्यांची नियमित तपासणी करण्यात यावी. ज्या गृहविलगीकरणातील रूग्णांची घरात नियमांनुसार व्यवस्था नसेल, अशा रुग्णांना तत्काळ कोविड केअर सेंटरमध्ये स्थलांतरीत करण्यात यावे. जेणेकरून त्या रुग्णांच्या माध्यमातून संसर्ग पसरु नये यासाठी प्रशासनाने नियोजन करावे, अशा सूचना पालकमंत्री भुजबळ यांनी दिल्या आहेत.
नियमांचे उल्लंघन करणाऱ्यावर कठोर कारवाई करा -
खासगी डॉक्टरांकडून कोरोनाबधित रूग्णांवर उपचार करण्यात येत असतील तर त्याची देखील नियमित माहिती प्रशासनास देण्याबाबत खासगी डॉक्टरांना कळविण्यात यावी. तसेच ज्या ठिकाणी रुग्णांची संख्या जास्त आहे तिथे प्रतिबांधित क्षेत्र जाहीर करून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यावर पोलिसांच्या मदतीने कारवाई करण्यात यावी, अशा सूचनाही पालकमंत्री छगन भुजबळ यांनी यावेळी दिल्या आहेत.
लग्नसोहळ्याच्या पोलिसांची नेमणूक करा -
व्यवसायिकांनी व्यवसाय करतांना गर्दी वाढणार नाही याचे भान ठेवून लागू करण्यात आलेल्या नियमांची अंमलबजावणी करावी. गर्दीच्या नियोजन व नियंत्रणासाठी प्रशासनाने पोलिसांचे सहकार्याने कार्यवाही करण्यात यावी. पोलिसांनी लग्नसोहळ्याना परवानगी देताना तेथे नियमांचे पालन होते आहे का, हे पाहण्यासाठी एक-दोन पोलिसांची नेमणूक करावी, असे निर्देश पालकमंत्री भुजबळ यांनी दिले.
लसीकरण वाढवा -
येवला व निफाड या दोन्ही तालुक्यात लसीकरण वाढविण्यासाठी आवश्यक ते नियोजन करण्यात यावे. जेणे करून लसीकरणाची मोहीम राबविताना कोणत्याही अडचणी येणार नाहीत आणि सर्वांचे वेळेत लसीकरण पूर्ण होईल, असे पालकमंत्री भुजबळ यांनी बैठकीत प्रशासकीय व आरोग्य यंत्रणेच्या अधिकाऱ्यांना सांगितले.
हेही वाचा -राज्यात आज आठ वाजल्यापासून जमावबंदी; 'हे' कडक निर्बंध लागू, सरकारकडून नवीन गाईडलाईन