नांदेड- राजस्थान राज्यातील कोटा येथून परतलेल्या २० विद्यार्थ्यांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. रविवारी नमुने घेतलेल्या आणखी ५५ जणांचा अहवाल येणे बाकी असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नीळकंठ भोसीकर यांनी सांगितले.
राजस्थान राज्यातील कोटा येथे आय आयटी व अन्य उच्च शिक्षणासाठी जिल्हयातील शेकडो विद्यार्थी गेले होते. लॉकडाऊनमुळे गेल्या दीड महिन्यापासून ते तेथेच अडकून पडले. महाराष्ट्र शासनाने पुढाकार घेऊन त्यांना आणण्यासाठी बसेस पाठवल्या. त्यामुळे ते विद्यार्थी परतू लागले आहेत.
नांदेडला परतलेल्या विद्यार्थ्यांना खबरदारीचा उपाय म्हणून शिवाजीनगर औद्योगिक वसाहतीतील कै. सुधाकरराव डोईफोडे ज्येष्ठ नागरिक भवनात थांबविण्यात आले. त्यांचे स्वॅब नमुने घेऊन तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्यापैकी 20 जणांचे अहवाल रविवारी रात्री निगेटिव्ह आले. त्यामुळे या विद्यार्थ्यांचा जीव भांड्यात पडला आहे. आणखी ५५ जणांचे अहवाल आलेले नाहीत. ते दुपारी किंवा संध्याकाळपर्यंत येऊ शकतात.
कोरोनाबाधितांची संख्या ३१, तिघांचा मृत्यू!
नांदेड शहरात कोरोनाबाधितांची संख्या ३१ झाली असून यातील तिघांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्या तिघांपैकी एक महिला सेलू (परभणी), एक महिला नांदेडच्या रहेमत नगर व एक वृद्ध पीर बुऱ्हाण नगर येथील रहिवाशी आहे.
उपचार सुरू असलेल्या २८ बाधितांमध्ये लंगर साहिब गुरुद्वाराचे २० कर्मचारी आहेत. उर्वरित ८ जणांमध्ये दोन जण गुरुद्वारा परिसरातील असून, यात्रेकरूंना सोडून पंजाब येथून परतलेले पाच वाहन चालक व एका मदतनीसाचा समावेश आहे.