नांदेड - राज्यभर भीषण दुष्काळ असताना पालकमंत्री रामदास कदम यांना नांदेडमध्ये यायला वेळ नाही. त्यांनी नांदेडच्या सर्व अधिकाऱ्यांना मुंबईला बोलावून घेत मंगळवारी मंत्रालयात वातानुकूलित थंडगार हवेत टंचाईबाबत बैठक घेतली. त्यामुळे जिल्हा दुष्काळाने होरपळत असताना पालकमंत्र्यांना याचे गांभीर्य नाही, असा रोष नागरिक व्यक्त करत आहेत.
जिल्ह्यातील सर्व धरणे आटत चालले असून भीषण पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. नागरिकांना हंडाभर पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. तर शेतकरी समस्यांच्या चक्रव्यूहात अडकला आहे. पण शासनाला कुठलेही गांभीर्य नसल्याची खंत आहे. निवडणुकीच्या कामासाठी अख्ख राज्य पायाखाली घालणारे नेते दुष्काळाच्या बाबतीत मात्र निवांत दिसत आहेत.
पालकमंत्री रामदास कदम यांच्या उपस्थितीत सोमवारी दुष्काळी परिस्थितीचा आढावा आणि जिल्हास्तरीय खरीप हंगाम पूर्व बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र, ती ऐनवेळी रद्द करण्यात आली आणि ती बैठक मंगळवारी मुंबईत मंत्रालयात घेण्याचे ठरविण्यात आले. त्यासाठी जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना बोलविण्याचा निरोप देण्यात आला. त्यामुळे जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीवर उपाय योजना करण्याचे सोडून सोमवारी जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, आयुक्त तसेच इतर अधिकारी आणि विभागप्रमुख मुंबईला रवाना झाले.
सध्या दुष्काळाची तीव्रता वाढत असताना पालकमंत्री कदम यांनी नांदेडला येऊन स्वतः दुष्काळी भागांना भेट देऊन पाहणी करणे आवश्यक होते. मात्र, त्यांनी मुंबईतच बैठक घेतल्यामुळे प्रशासन आणि शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संतापाची भावना निर्माण झाली आहे.