नागपूर - अमरावती मार्गावरील रवी नगर चौकात झालेल्या अपघातात एक ऑटो उलटल्यानंतर त्याला आग लागल्याची घटना समोर आली आहे. ज्यावेळी आग लागली त्यावेळी ऑटोमध्ये दोन महिला प्रवास करत होत्या. या घटनेत त्यादेखील किरकोळ भाजल्या असून त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
नागपूर-अमरावती मार्गावर मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. वाडी येथून नागपूर शहरात येणारे प्रवासी ऑटोचा सर्वाधिक वापर करतात. आज देखील प्रवाश्यांना घेऊन निघालेल्या ऑटोला रवी नगर चौकात छोटासा अपघात झाला मात्र ब्रेक जोरात मारल्याने ती ऑटो उलटली, ज्यामुळे ऑटोतील पेट्रोलमुळे आग लागली. ऑटो उलटल्याने प्रवास करणाऱ्या दोन महिला त्यात अडकल्या होत्या. आग भडकण्यापूर्वीच नागरिकांनी त्या दोन महिलांना सुखरूप बाहेर काढले होते.
यात त्या महिला कोरकोळ भाजल्या असून त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. ऑटो जळत असल्याची सूचना मिळताच अग्निशमन विभागाची एक गाडी घटनास्थळी पोहचली होती. त्यानंतर १० मिनिटात आगीवर नियंत्रण मिळाल्यानंतर त्या मार्गावरील वाहतूक पुन्हा सुरू करण्यात आली आहे. अंबाझरी पोलिसांनी ऑटो चालकाला ताब्यात घेतले आहे.