नागपूर - शहरातील प्रसिद्ध स्वामी नारायण शाळेच्या समोर आज पालकांनी चांगलाच गोंधळ घातला. शाळेची फी भरली नाही म्हणून शेकडो विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा निर्णय शाळा प्रशासनाने घेतल्यामुळे पालकांनी शाळेसमोर येऊन रोष व्यक्त करायला सुरवात केली. पालकांची वाढती गर्दी लक्षात घेता शाळा प्रशासनाने नारमाईची भूमिका घेत, पुन्हा विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणाची सोय उपलब्ध करवून देण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर पालकांनी आपले आंदोलन मागे घेतले.
हेही वाचा - धक्कादायक: नागपूरच्या शासकीय रुग्णालयात भटक्या कुत्र्यांचा वावर
कोरोना काळात संपूर्ण देशातील शाळा बंद करण्यात आल्या होत्या. सुमारे १० ते ११ महिने या शाळा बंद राहिल्याने शिक्षण पद्धतीमध्ये आमुलाग्र बदल झालेला आहे. ऑनलाइन शिक्षणाच्या माध्यमातून रोज विद्यार्थ्यांची शाळा घरीच भरत आहे. त्यामुळे, राज्यात अनेक ठिकाणी शाळा आणि पालकांमध्ये फीच्या मुद्द्यावरून वाद होत आहेत. असाच एक वाद आज नागपुरातील नामांकित स्वामी नारायण शाळेत घडून आला. स्वामी नारायण शाळेच्या वर्धमाननगर शाखेसमोर आज शेकडो पालकानी एकत्रित येत शाळा प्रशासनाच्या बळजबरीने फी वसूल करण्याच्या धोरणाचा विरोध केला. तर, कोरोनामुळे आलेल्या आर्थिक संकटाला लक्षात घेऊन आम्ही आधीच या वर्षी फी वाढवली नाही, उलट २५ टक्के फी कमी केली असल्याचा दावा शाळा व्यवस्थापनाने केला.
विद्यार्थ्यांना व्हॉट्सअॅप ग्रुपच्या बाहेर काढले
पालकांचा आरोप होता, की शाळेने परीक्षेच्या एक दिवसापूर्वी शेकडो विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणासाठी बनवलेल्या व्हाट्सअॅप ग्रुपमधून बाहेर काढले. तसेच, ऑनलाइन शिक्षणासाठीची लिंकही उपलब्ध करून देणे बंद केले. या पार्श्वभूमीवर आज सकाळी दहाच्या सुमारास शेकडो पालक शाळेवर मनमानीचा आरोप करत शाळेच्या मुख्य दारासमोर गोळा झाले. सुरुवातीला एक तास तर शाळेने पालकांच्या विरोध प्रदर्शनाची तसदीच घेतली नाही. मात्र, हळू हळू पालकांची संख्या वाढत असल्याचे पाहून शाळा व्यवस्थापनाने नरमाईची भूमिका घेत पालकांशी संवाद केला. अखेरीस शाळा व्यवस्थापनाने संध्याकाळपर्यंत व्हॉट्सअॅप ग्रुपमधून काढलेल्या सर्व विद्यार्थ्यांना पुन्हा जोडून त्यांचे ऑनलाइन शिक्षण पूर्ववत करण्याचे आश्वासन दिले.
हेही वाचा - हुतात्मा जवान भूषण सतई यांच्या कुटुंबीयांना 1 कोटींची मदत