मुंबई : राज्यामध्ये सरकारच्यावतीने अनेक योजना सुरू करण्यात आल्या आहेत. महाविकास आघाडी सरकारने थांबवलेले सर्व प्रकल्प पुन्हा नव्याने सुरू करण्यात आले आहेत. गेल्या अडीच वर्षांमध्ये थांबलेला विकास आता वेगाने सुरू आहे. गेल्या वर्षभरामध्ये राज्यात एक लाख 18 हजार कोटी रुपयांची परदेशी गुंतवणूक आली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधी पक्षांनी मांडलेल्या अंतिम आठवडा प्रस्तावाच्या उत्तरात बोलताना विधानसभेत दिली.
औरंगजेबवाल्यांना ठेचणार : औरंगजेब याचा फोटो स्टेटसला ठेवून काही लोक महाराष्ट्रात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. औरंगजेबाचा फोटो घेऊन नाचणारे लोक महाराष्ट्रात चालणार नाहीत. त्यांना वेळीच ठेचून काढले जाईल. अबू आझमी, रईस शेखसुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचा सन्मान करतात. महाराष्ट्राचे महानायक छत्रपती शिवाजी महाराज होते आणि औरंगजेब खलनायक होता, तो महाराष्ट्राचा शत्रू होता. त्यामुळे ही पिलावळ आणि त्यांची वळवळ सहन केली जाणार नाही, असा इशारा यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिला.
महाराष्ट्राचा गद्दार कोण : काही लोक अजूनही गद्दार आणि खोके या शब्दांचा वापर करून महाराष्ट्राची दिशाभूल करत आहेत. ज्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी गद्दारी केली, त्यांनी शिवसैनिकांशी गद्दारी केली, ज्यांनी युतीत निवडून आल्यानंतर मित्राला धोका दिला ते गद्दार आहेत की नाही. हे एकदा महाराष्ट्राने स्पष्ट करावे, महाराष्ट्रात खरा मतदार कोण हे एकदा स्पष्ट व्हायला पाहिजे, अशा शब्दात एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर शरसंधान साधले. बाळासाहेबांचे विचार हीच आमची संपत्ती असून त्यांनी उभारलेल्या कोणत्याही संपत्तीवर आम्ही हक्क सांगणार नाही, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
उद्योगाची श्वेतपत्रिका : महाविकास आघाडी सरकारमध्ये महाराष्ट्र उद्योग क्षेत्रात तिसऱ्या क्रमांकावर होता. आता तो पहिल्या क्रमांकावर आला आहे. पूर्वी दवोस येथील परिषदेत किती करार झाले याची माहिती नाही. मात्र, आम्ही एक लाख 37 हजार कोटी रुपयांचे सामंजस्य करार केले आहेत, असा दावा मुख्यमंत्र्यांनी केला. उद्योगाची श्वेतपत्रिका काढण्याचे धाडस या सरकारच्या उद्योग मंत्र्यांनी दाखवले आहे. त्यामुळे हे सरकार फेसबुक लाईव्ह आणि घरी बसून काम करणारे नाही, असा टोलाही यावेळी मुख्यमंत्र्यांनी लगावला.
पंतप्रधानांचे कौतुक : नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश प्रगतीपथावर असून, पंतप्रधान जगात अतिशय ताकदवान व्यक्ती म्हणून ओळखले जाऊ लागले आहेत. भारताची अर्थव्यवस्था जगात दहाव्या क्रमांकावर होती, ती आता पाचव्या क्रमांकावर आली आहे. तिसऱ्या क्रमांकावर आणण्याचा पंतप्रधानांचा प्रयत्न आहे. तो नक्की पूर्ण होईल, असे एकनाथ शिंदेंनी सांगितले.
केंद्राचे पाठबळ : राज्य सरकारला केंद्राचे पाठबळ मिळत असल्याचा दावाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केला. गेल्या अडीच वर्षांमध्ये राज्यात अनेक गोष्टींचा दर्जा घसरला होता. शिक्षणासह आरोग्याचा दर्जाही घसरला होता. आता सर्व बाबतीत राज्य सरकार प्रगतिशील असल्याचे त्यांनी सांगितले. राज्य सरकारच्या शासन आपल्या दारी या योजनेची प्रभावी अंमलबजावणी सुरू असून गेल्या तीन महिन्यात सव्वा कोटी लोकांपर्यंत शासन पोहोचले असून, नागरिकांना एका छताखाली सर्व योजना देण्यात येत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
शिक्षकांची 30 हजार पदे : शाळांमध्ये दर्जेदार शिक्षण देण्याचा प्रयत्न सुरू असून शिक्षकांना प्रशिक्षण दिले जात आहे. शिक्षकांची 30 हजार पदे लवकरच भरली जाणार आहेत. येत्या दोन महिन्यात ही प्रक्रिया सुरू होईल. तसेच विद्यार्थ्यांच्या पाठीवरचे ओझे कमी करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. आतापर्यंत 2308 शाळांमध्ये संगणक प्रशिक्षण लॅब उभारण्यात आली आहे. हजार शाळांमध्ये इंग्रजी भाषेची सुरुवात करण्यात आली असून, 65 हजार शाळेतील 55 लाख विद्यार्थ्यांना भाषा आणि गणित विषयाचे पूरक साहित्य देण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
घोटाळा करणाऱ्यांना माफी नाही : औषधात घोटाळा झाल्याच्या बाबी समोर आल्या आहेत. मात्र, यापुढे औषध भ्रष्टाचार करणाऱ्याला माफ केले जाणार नाही. माणसाला मारणारे लाईफ लाईन हॉस्पिटल होते. ज्यांना अनुभव नव्हता, त्यांनाही कामे देण्यात आली होती. या सर्वांची योग्य चौकशी केली जाईल, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
रखडलेल्या योजना पूर्ण करणार : मुंबई आणि महाराष्ट्रात हजारो पुनर्विकास योजना रखडलेल्या आहेत. तर या योजनांमधील लाखो लोकांना घरापासून वंचित राहावे लागत आहे. त्यांना भाडे सुद्धा मिळत नाही, अशी परिस्थिती आहे. यासाठी म्हाडा, सिडको, एम एम आर डी ए, यांना या सर्व पुनर्विकास योजना पूर्ण करण्यासाठी मोठ्या कंपन्यांची नियुक्ती करण्याचे आदेश दिले असून, यामध्ये अडकलेल्या नागरिकांना त्यांचे भाडे वेळेवर मिळावे यासाठी कायद्यात बदल करावा लागला, तर त्या दृष्टीने करण्यासाठी राज्य सरकारची तयारी असून नागरिकांना संरक्षण दिले जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले.
विरोधकांचा सभात्याग : उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्याच्या प्रगतीचा आलेख मांडला. आणि आपली पाठ थोपटून घेतली. त्यांनी केवळ राजकीय अभिनिवेश दाखवला. महाराष्ट्रात खरा गद्दार कोण? असा सवाल करीत उत्तर दिले. आम्ही उपस्थित केलेल्या प्रश्नावर ते बोलले नाहीत त्यामुळे सरकारच्या उत्तराने समाधान झाले नाही, असे सांगत विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टिवार यांनी सांगत विरोधकांनी सभात्याग केला.
हेही वाचा -