मुंबई - युती बाबतचा संभ्रम दूर झाला आहे, युती झाली आहे. पत्रकार परिषद घेऊन युतीची घोषणा होईल. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी युतीची घोषणा केली आहे. यादीही लवकरच जाहीर होईल, असे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सांगितले. मातोश्रीवर आज संध्याकाळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या नेत्यांची बैठक बोलावली होती. ती बैठक संपल्यावर राऊत यांनी माध्यमांना युतीबाबत प्रतिक्रिया दिली.
हेही वाचा - काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गोपालदास अग्रवाल यांचा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजप प्रवेश
यावेळी राऊत म्हणाले, शिवसेनेत कोणी नाराज नाही, इच्छुक जास्त असतात म्हणून थोडी नाराजी असतेच. शिवसेनेत निष्ठा, विश्वास महत्वाचा असतो. वरळी विधानसभा बिनविरोध करण्यासाठी मी शरद पवार यांना भेटलो नाही, असे स्पष्टीकरण देखील राऊत यांनी दिले. तर बिनविरोध नाही तर अधिक मताधिक्यांनी आदित्य ठाकरे निवडून येतील, असा विश्वासही राऊत यांनी व्यक्त केला.
हेही वाचा - अखेर मुंदडा कुटुंबीय भाजपात दाखल; केजमध्ये संगीता ठोंबरेंचे तिकीट कापले?
दरम्यान, अनेक चर्चांनंतर अखेर एका संयुक्त पत्रकाद्वारे भाजप-शिवसेनेसह मित्र पक्षांच्या महायुतीची सोमवारी घोषणा करण्यात आली. या पत्रकावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि शिवसेना नेते सुभाष देसाई यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.