मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांना पवार शैलीत इशारा दिला होता. त्याला उत्तर देताना संजय शिरसाट यांनी रोहित माझे चांगले मित्र असून, त्यांना मी शोधत असल्याचा उपरोधित टोला लगावला आहे.
शरद पवारांचे मन वळवण्याचा प्रयत्न सुरू - दिल्लीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भाजपकडून मनधरणी सुरू असल्याच्या चर्चा सुरू आहेत. यावर प्रतिक्रिया देताना संजय शिरसाट म्हणाले की, कोण कोणाचे मन वळवते हे येत्या काही दिवसातच समोर येईल. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासंदर्भात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली असल्याचे शिरसाट यावेळी म्हणाले.
रोहित पवार हे माझे चांगले मित्र असून, त्यांना मी खूप वेळचा शोधत आहे. त्यांच्या मतदारसंघातील एमआयडीसीचा प्रश्न अजूनही सुटलेला नाही. यापूर्वी राज्यामध्ये महाविकास आघाडीचे सरकार होते. सरकारमध्ये तुम्ही होता आणि तुमचा प्रश्न त्या सरकारने सोडविला नाही. मात्र, आमच्या सरकारचा मंत्री येऊन त्याला सहकार्य करण्याचे काम करत आहे. हे सर्वसामान्यांचे सरकार असून कोणाचाही प्रश्न असला तरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांचा प्रश्न मार्गी लावतात - संजय शिरसाट, आमदार, शिंदे गट
पुतण्या काकांचीच बाजू घेणार - रोहित पवार यांनी एक ट्विट केले होते. त्या ट्विटमध्ये त्यांनी म्हटले आहे की, सत्तेत तिघेजण मात्र जाहिरातीत दोघेजण का? यावर उत्तर देताना संजय शिरसाट म्हणाले की, साहजिकच आहे रोहित पवार हे अजित पवारांचे पुतणे आहेत, नाते तुटत नसते, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार होण्यापूर्वीच्या त्या जाहिराती आहेत, आता जाहिरातींची सुधारणा केली जाणार असल्याचेही शिरसाट म्हणाले.
काय म्हणाले रोहित पवार - रोहित पवार यांच्या कर्जत जामखेड मतदारसंघातील एमआयडीसीबाबत शासनाने अधिसूचना जारी करावी यासाठी त्यांनी आज विधान भवनात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ आंदोलन केले. यावर संजय शिरसाट यांनी टीका केली होती. त्यावर रोहित पवार यांनी उत्तर दिले आहे. शिरसाट यांना मी विनंती करतो. उगाच पाठीमागे काहीतरी बोलण्यापेक्षा हिम्मत असेल तर माझ्यासमोर यावे आणि बोलावे, तसेच तुम्हाला एखाद्या विषयातील माहिती नसेल तर बोलू नका, असा इशारा रोहित पवार यांनी संजय शिरसाट यांना दिला.