मुंबई - आजपासून (दि. 20) राज्यातील महाविद्यालय सुरू झाली असून मुंबईतील अनेक महाविद्यालयात विद्यार्थ्यांचा थंडा प्रतिसाद पहायला मिळाला. काही महाविद्यालय नियोजन पूर्ण झाले नसल्यामुळे बंद होती.
अनेक नामांकित महाविद्यालय बंद
मुंबईत अनेक महाविद्यालय मात्र आज बंद होती. रूईया, एचआर, जयहिंद आणि झेवियर्स यांसारख्या महाविद्यालयांचा समावेश आहे. नियोजन न झाल्याने पदवी अभ्यासक्रमाचे वर्ग सुरू झाले नाही. काही महाविद्यालय प्रत्यक्ष तर काही महाविद्यालयांनी आधीच ऑनलाइन परिक्षेचे नियोजन केल्यामुळे वर्ग न भरवता ऑनलाइनच परिक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे.
काय असणार आहेत नियम
50 टक्के उपस्थितीसह महाविद्यालये सुरू होणार आहेत. पण, महाविद्यालयात कॅन्टिन तसेच कॅम्पस परिसरातील दुकानांना बंदी असणार आहे. महाविद्यालयात सांस्कृतिक कार्यक्रम आणि खेळांवरही बंदी असेल. महाविद्यालायत विद्यार्थ्यांना दोन डोसचे निर्बंध असतील. दोन डोस घेतलेल्या विद्यार्थ्यांनाच महाविद्यालयात प्रवेश दिला जाणार आहे. महाविद्यालय सुरू करताना कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन स्थानिक प्रशासन, महानगरपालिका निर्णय घेऊ शकतात. प्रत्येक महाविद्यालयात स्वच्छता राखणे, सुरक्षित अंतर, विद्यार्थ्यांना मास्क या नियमांचे काटेकोर पालन करावे लागणार आहे.
प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचे काय
महाविद्यालयात येणाऱ्या विद्यार्थ्यांनी दोन डोस घेणे बंधनकारक आहे. मात्र, पदवीच्या प्रथम वर्षात असणाऱ्या बहुतांश विद्यार्थ्यांचे अठरा वय पूर्ण नसल्याने त्यांचे लसीकरण झाले नाही. त्यामुळे प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांना महाविद्यालयातील प्रवेशासाठी वाट पहावी लागणार आहे.
हेही वाचा - 'टॅक्सीडर्मी'तून केले जाते मृत प्राण्यांचे जतन