लातूर- कोरोना टेस्ट केल्यानंतर 14 दिवसांनी पालकमंत्री अमित देशमुख सोमवारी लातुरात दाखल झाले. कोरोनाच्या अनुषंगाने त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली. तर जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाला किमान 3 महिने पुरेल एवढे अन्नधान्याचे नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी संबधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
हेही वाचा- तळीरामांची लवकरच होणार 'सोय'; अल्कोहोलिक बेवरेज कंपन्यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर लातूर जिल्ह्यातील एकाही व्यक्तीला अन्नधान्य कमी पडणार नाही याची प्रशासनाने दक्षता घ्यावी. तसेच शेल्टर कॅम्प मधील सर्व बेघर, स्थलांतरित मजुरांनाही अन्नधान्याचा मुबलक पुरवठा झाला पाहिजे. जिल्ह्याच्या प्रत्येक व्यक्तीला पुढील तीन महिन्याच्या काळात योग्य प्रमाणात अन्नधान्याचा पुरवठा करण्याचे योग्य नियोजन करावे, असे निर्देश देशमुख यांनी दिले.
कोरोना विषाणूच्या अनुषंगाने केंद्र शासनाच्या आयुष मंत्रालयाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन जिल्ह्यात झाले पाहिजे. त्याप्रमाणेच जिल्ह्याच्या प्रत्येक शासकीय कार्यालयाचा स्टँडर्ड ऑपरेटींग प्लॅन तयार करावा, असेही देशमुख यांनी दिले.
नागरिकांनी घाबरुन जाऊ नये. परंतु, शासन व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे. विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्था व लातूर महापालिकेने पुढील 30 दिवसात बायो मेडिकल वेस्ट प्लँट कार्यान्वित करण्याचे निर्देश देऊन लातूर महापालिकेने शहराच्या हद्दीत पोलीस विभागाच्या मदतीने चेक पोस्ट निर्माण करावीत, असेही त्यांनी सांगितले.
आरोग्य विभागाने व्यक्तींचे तपासणीसाठी घाशातील स्त्रावाचे नमुने (स्वॅब) जागेवर जाऊन घ्यावेत. प्रत्येक व्यक्तीला रुग्णालयात पाठविण्याची आवश्यकता नाही. तसेच कोरोनाचा प्रार्दुभाव वाढला तर प्रशासनाची पूर्ण तयारी असणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी जिल्हाधिकारी जी.श्रीकांत यांनी लॉकडाऊन जाहीर झाल्यापासून प्रशासनाने केलेल्या विविध उपाय योजनांची माहिती दिली. यावेळी पोलीस अधीक्षक डॉ. राजेंद्र माने, अप्पर जिल्हाधिकारी डॉ.अनंत गव्हाणे, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांच्यासह सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित होते.