जालना - भोकरदन तालुक्यातील केदारखेडा येथील गिरिजा-पुर्णा नदीवरील जुन्या पूलाच्या मध्य भागाचा पाया उघडा पडला होता. पाण्याच्या जोरदार प्रवाहाने सुमारे शंभर ते सव्वाशे मीटर लांबीचा पूल कोसळला आहे. बुधवारी अकरा वाजेच्या सुमारास घडलेल्या या प्रकाराने प्रवासी नागरिकांची तारांबळ उडाली. त्यानंतर लगतच्या पूलावरून दुहेरी वाहतूक सुरू केली.
हेही वाचा... जाती-धर्माच्या पलीकडे जाऊन समाजकारणाचा यज्ञ तेवत ठेवणे गरजेचे - सुशिलकुमार शिंदे
जालना ते जळगाव मार्गावर केदारखेडा येथील गिरिजा-पुर्णा नदीवर किमान अंदाजे 80 ते 90 वर्षे अगोदर सुमारे शंभर ते सव्वाशे मीटर लांबीचा पूल बांधण्यात आला. हा ब्रिटिशकालीन पूल अनेक महापुरांचा साक्षीदार ठरला आहे. कमी उंचीचा हा पूल महापुरात पाण्याखाली जात असल्याने या पुलालगत केंद्रीय रस्ते निधीतून नव्याने उंच पूल उभारण्यात आला. पूर्वी महापुरात जुना पूल पाण्याखाली गेल्यावर वाहतुक पुर्णपणे बंद होत होती. मात्र नव्याने झालेल्या पूलामुळे वाहतुकीचा प्रश्न निकाली निघाला.
हेही वाचा... संपूर्ण देशात लागू करणार 'एनआरसी' : अमित शाह
दरम्यान, काही वर्षांपूर्वी महाड येथील सावित्री पूल वाहून गेल्यावर शासनाने ब्रिटिशकालीन पूलाच्या कामाची स्ट्रक्चरल ऑडिट केले. त्या वेळी जुन्या पुलावरून वाहतूक बंदचा फलकही लावण्यात आला होता. त्यामुळे जुन्या पूलावरून वाहतूक बंद करून ती नव्या पुलावरून दुहेरी वाहतूक सुरू करण्यात आली. त्यानंतर जुना पूल केवळ पादचाऱ्यांसाठी वापरात होता.
बुधवारी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास मासेमारी करणाऱ्यांनी येथे मोठा आवाज झाल्याचे ऐकले. त्यांनी पडलेल्या पुलाची काढलेली छायाचित्रे काही क्षणातच सोशल मीडियावर पसरली. यानंतर नागरिकांनी पडलेला पूल पाहण्यासाठी गर्दी केली. पूल पडल्याची माहिती मिळताच तहसीलदार संतोष गोराड, सार्वजनिक बांधकाम विभागाचे दिगंबर कोल्हे आदींनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली.