गोंदिया - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांचा काल (सोमवारी) 14 जूनला वाढदिवस होता. त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सालेकसा तालुक्यात मनसेच्या वतीने व सालेकसा मनसे महिला सेना यांच्या संकल्पनेने पेट्रोलवर प्रतिलिटर १० रुपयांची सूट देण्यात आली. यामुळे पेट्रोल पंपावर रांग लागली होती.
94.15 प्रतिलिटर मिळाले पेट्रोल -
केंद्र शासन आणि महाराष्ट्र शासनाच्या चुकीच्या कर आकारणीमुळे पेट्रोलचे भाव शंभरी पार झाले आहे. याचा निषेध करत तसेच राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त नागरिकांना स्वस्त पेट्रोल उपलब्ध करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम राबविला, अशी माहिती मनसेचे तालुकाध्यक्ष ब्रजभूषण बैस यांनी दिली. उपक्रमातून तालुक्यातील नागरिकांना पेट्रोलचा दर 104.15 रुपये होता. नागरिकांना या दराच्या दहा रुपयांनी स्वस्त म्हणजे 94.15 रुपये प्रतिलिटर प्रमाणे पेट्रोल उपलब्ध करून देण्यात आले.
हेही वाचा - गृहराज्यमंत्री शंभूराज देसाईंवर पाळत ठेवल्याचा संशय; 'त्या' युवकांचा शोध सुरू
कुपन करण्यात आले वितरित -
सकाळी 11.00 ते सायंकाळी 5.00 वाजता पर्यंत सालेकसा येथील क्षीरसागर पेट्रोल पंप येथे हे स्वस्त पेट्रोल उपलब्ध करून देण्यात आले. यासाठी सालेकसा बसस्थानक येथे मनसेच्या माध्यमातून आयोजित केलेल्या मंडपातून कुपनचे वितरण करण्यात आले. कुपनचे वितरण सकाळी 11.00 ते 2.00 दोन वाजेपर्यंत करण्यात आले. याचा फायदा तालुक्यातील नागरिकांनी घेतला. कुपनचा कालावधी 14 जूनला सायंकाळी पाच वाजतापर्यंतच आल्याने या ठिकाणी लोकांनी मोठ्या प्रमाणात पेट्रोल भरण्यासाठी शेतकऱ्यांनी व कामगारांनी मोठी गर्दी केली होती. पेट्रोल स्वस्त देण्याचा उपक्रमाने ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना व कामगारांना थोडा फार दिलासा मिळाल्याचे बोलले जात आहे.
हेही वाचा - खासदार संभाजी व खासदार उदयनराजे भोसले यांची केंद्रीय तपास यंत्रणेकडून चौकशी करा - अॅड. सदावर्ते