बुलडाणा- प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या स्वाब नामुन्यांच्या अहवालांपैकी आज 32 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 30 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 2 अहवाल पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले आहे.
मलकापूर येथील 75 वर्षीय वृद्ध पुरुष आणि 58 वर्षीय महिला रुग्णाचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्याचप्रमाणे आज बुलडाणा कोविड रुग्णालयात मलकापूर येथील 3 रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉल प्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. यामध्ये मलकापूर येथील 50 व 27 वर्षीय महिला आणि 10 वर्षीय मुलाचा समावेश आहे. हे सर्व पूर्वी आलेल्या 38 वर्षीय कोरोनाबाधित पुरुषाच्या निकट संपर्कातील होते.
तसेच, आतापर्यंत 1 हजार 461 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात एकूण 85 कोरोनाबाधित रूग्ण आहेत. त्यापैकी तीन जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 53 कोरोनाबाधित रुग्ण निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 53 आहे. सध्या रुग्णालयात 29 कोरोनाबधित रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच, 93 जणांचे अहवाल प्रतिक्षेत असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.आर.जी पुरी यांनी दिली आहे.