बीड - जिल्ह्यातील अंबाजोगाई शहरात स्वाराती रुग्णालयाच्या कोविड सेंटरमध्ये दररोज शंभरच्या पुढे पॉझिटिव्हचा आकडा वाढत आहे. परिणामी मृत्यू घरामध्ये देखील वाढ होत असल्याने अंबाजोगाई येथील नगरपालिकेच्या स्मशानभूमीत एकाच चितेवर आठ जणांचे अंत्यविधी करण्याची वाईट वेळ पालिका प्रशासनातील कर्मचाऱ्यावर आली आहे. असा प्रकार सहा महिन्यापूर्वीच अंबाजोगाई येथेच घडला होता. पुन्हा दुसऱ्यांदा मंगळवारी अंबाजोगाईत कोरोनामुळे मृत्यू झालेल्या 8 जणांवर एकाच वेळी, एकाच चितेवर अंत्यविधी करण्यात आले आहेत.
अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात 7 व लोखंडीच्या कोविड सेंटरमधील एक अशा एकूण 8 कोविड मृतांवर नगर पालिका प्रशासनाकडून मांडवा रोडवरील स्मशानभूमीत एकाच सरणावर अग्निडाग देण्यात आला. मृतांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागल्याने अंबाजोगाईत चिंता व्यक्त केली जात आहे. अंबाजोगाई येथे परळी, केज, धारूर, गंगाखेड, माजलगाव आदी तालुक्यातील रुग्ण कोरोनावरील उपचारासाठी येतात. कोविड केअर सेंटरमध्ये उपचारासाठी येणारे रुग्ण हे उच्च रक्तदाब, मधुमेह, श्वसनाचे विकार असे ६० ते ८० वयोगटातील असतात. हे रुग्ण अंगावर आजार काढून जास्त झाल्यानंतरच रुग्णालय गाठतात. त्यामुळे मृत्यूंची संख्या वाढू लागली आहे.
अंबाजोगाई कोरोना हॉटस्पॉट
अंबाजोगाई तालुक्यात चार दिवसात पाचशेच्या जवळपास रुग्ण पॉझिटिव्ह निघाले आहेत. मात्र, काही नागरिक अजूनही गंभीर नसल्याचे दिसून येते. पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत मृतांचे प्रमाण कमी असले तरी अंबाजोगाई हे कोरोनाचे हॉटस्पॉट बनले आहे. सोमवारी शहरातील मंगळवार पेठ, भटगल्ली, बोरखेड (परळी), लोखणी दावारागाव, अंबलटेक, आपेगाव, मंगरूळ (माजलगाव) व धारूर या आठ गावातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा सोमवारी मृत्यू झाला. या रुग्णावर मंगळवारी दुपारी पठाण मांडवा रस्त्यावरील पालिकने निर्माण केलेल्या कोविड रुग्णांच्या अंत्यसंस्काराच्या ठिकाणी एकाच सरणावर आठ जणांना अग्निडाग देण्यात आला. यामध्ये एक महिला असून सर्व रुग्ण ६० वर्षापुढील आहेत. या घटनेनंतर अंबाजोगाईत मरण स्वस्त आहे, असेच म्हणावे लागेल.
निर्बंधांबाबत नागरिक गंभीर नाहीत
कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असला तरी जिल्हाधिकाऱ्यांनी आज कठोर निर्बंध लादलेले असतानाही काही नागरिक गंभीर नसल्याचे दिसून आले. नेहमी प्रमाणेच शहरातील मुख्य रस्ते गजबजलेले दिसून आले. मंगळवारी दुपारी घाटनांदूर येथील एका महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून तिच्या पार्थिवावर उद्या बुधवारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
हेही वाचा - आरोग्यमंत्र्यांची अचानक मालेगावला भेट; सामान्य रुग्णालयासह महापालिकेच्या रुग्णालयांची केली पाहणी