छत्रपती संभाजीनगर : पैशाच्या वादातून बायजीपुरा भागात भर रस्त्यावर गोळीबार झाल्याची घटना घडली. अलखुतुब हबीब हमद असे या गोळीबारात मृत झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर, समीर बशीर पठाण हा तरुण या गोळीबारात जखमी झाला आहे. हा सर्व थरार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. फैयाज पटेल असे गोळीबार करणाऱ्या संशयित आरोपीचे नाव असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.
साडे सात हजारांसाठी घेतला जीव : मृत हमदचे आरोपी फैय्याजकडे साडेसात हजार रुपये होते, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. हमदने आपले पैसे परत मिळावे म्हणून फैय्याजकडे सतत तगादा लावला. मात्र फैय्याज पैसे देण्यास टाळाटाळ करत होता. त्यामुळे पैसे देण्यावरून त्यांच्यात काहीवेळा वाददेखील झाले होते. फैय्याजने एकदा हमदला गोळीने उडवण्याची धमकी दिली होती. त्यातच बुधवारी रात्री आठच्या सुमारास हमद हा हयात क्लिनिकच्या समोर बसलेला असताना समोरच्या गल्लीतून आरोपी फैय्याज पटेल आला. त्याने खिशातून गावठी कट्टा काढून तेथूनच हमदच्या दिशेने गोळी चालवली. मात्र, त्याचा नेम चुकला आणि गोळी शटरवर लागली. त्याने दुसरी गोळी चालवली, ती गोळी समीर बशीर पठाणच्या हाताला लागली. नेम लागत नसल्याने आरोपीने थेट समोर जाऊन हमदच्या छातीत गोळी मारली. त्यानंतर हमद जमिनीवर कोसळला. या घटनेनंतर फैय्याज गल्लीतून पसार झाला.
मृत तरुणाचे 10 दिवसाने होणार होते लग्न : पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार मृत अलखुतुब हबीब हमद हा पैठण गेट भागातील एका कपड्याच्या दुकानात काम करीत होता. त्याचे आई - वडील विभक्त झाले असून तो आईसोबतच राहायचा. येत्या 20 ऑगस्ट रोजी त्याचे लग्न होणार होते, अशी माहिती त्याच्या निकटवर्तीयांनी दिल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले आहे. गजबजलेल्या भागात भर रस्त्यावर तीन राऊंड फायरिंग करण्यात आल्याने शहरात दहशतीचे वातावरण आहे. पैशांच्या वादातून ही घटना झाली आहे. घटना कळताच जीन्सी पोलीस घटनास्थळी दाखल झाले, तोपर्यंत आरोपी पसार झाला. याबाबत अधिक तपास करण्यासाठी पोलिसांनी आपली चक्र फिरवायला सुरुवात केली आहे. याबाबत पुढील कारवाई केली जात असल्याची माहिती जीन्सी पोलिसांकडून देण्यात आली.
मागील आठवड्यात गोळीबाराची घटना : महानगर पालिकेतील निवृत्त सफाई कर्मचारी प्रभाकर आहिरे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी 31 जुलैला भरदिवसा गोळीबार केला होता. या घटनेत हल्लेखोराने दोन गोळ्या झाडल्या होत्या. नशिबाने साथ दिल्याने त्यात ते बचावले. कोणाशीही शत्रुत्व नसताना एका सफाई कर्मचाऱ्यावर जीवघेणा हल्ला झाल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जाते होते. या घटनेत आरोपी घरात येताना आणि गोळीबार करून जातानाचे सीसीटिव्ही फुटेज पोलिसांना मिळाले होते. यात घटनेचा तपास पूर्ण करण्यास पोलिसांना यश मिळाले असून प्रभाकर आहिरे यांचा मुलगा महादू आहिरे मूळ सूत्रधार असल्याचे उघड झाले. मात्र अशा घटना सर्रास होत असल्याने पोलिसांचा वचक राहिला नाही का, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे
हेही वाचा -