अकोला - घरकुलाच्या वादातून एका भावाने दुसर्या भावाची दगडाने ठेचून हत्या केल्याची घटना दहीहंडा पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या दोनवाडा बुद्रुक येथे शनिवारी रात्री घडली. पोलिसांनी आरोपी निरंजनदास शामराव सहारे यास अटक केली असून आंबादास शामराव सहारे असे मृत भावाचे नाव आहे.
दोनवाडा येथील अंबादास सहारे व त्यांचा भाऊ निरंजनदास सहारे यांच्यामध्ये घरकुल बांधकामाच्या पैशांवरुन वाद झाला. तसेच माझ्या पत्नीला ही तुम्हीच मारले असा, आरोप निरंजनदास त्याचा भाऊ अंबादास यांच्यावर करत होता. हा वाद विकोपाला गेल्याने निरंजनदास याने त्याच्या भावाला दगडाने ठेचून मारून टाकले.
घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली. ग्रामस्थांनी दहीहंडा पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रेमानंद कात्रे यांना घटनेची दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सर्वोपचार रुग्णालयात पाठविला. निरंजनदास सहारे याला पोलिसांनी अटक केली असून, पुढील तपास ठाणेदार कात्रे करीत आहे.