अहमदनगर- दोन दिवसांपूर्वी शिर्डी विमानतळारून स्पाईस जेट कंपनीचे विमान धावपट्टीवरुन घसरल्याने विमानसेवा झाली होती ठप्प. त्यामुळे शिर्डी विमानसेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, आजपासून शिर्डी विमानतळावरुन विमानसेवा पूर्ववत झाली आहे. मातीत फसलेले विमान बाहेर काढल्यानंतर येथील विमानसेवा सुरळीत करण्यात आली आहे.
दोन दिवसांपूर्वी दिल्लीहून आलेले विमान दुपारी साडेचार वाजता शिर्डी येथे पोहोचले होते. विमानतळावरुन उतरताना ते धावपट्टीवरुन घसरले. यातील प्रवासी तब्बल साडेतीन तास विमानातच अडकले होते. संध्याकाळी ७ वाजून ४० मिनिटांनी यातील प्रवाशांना बाहेर काढण्यात आले.
विमान धावपट्टीवरुन घसरण्याची ही दुसरी वेळ होती. यापूर्वी मुंबईहून शिर्डीला आलेले विमान धावपट्टीवर घसरले होते. या घटनेची चौकशी प्रशासनाकडून करण्यात येणार आहे. डिजीसीएचे पथक विमानतळावर दाखल झाले आहे. तोपर्यंत सर्व उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. यामुळे प्रवाशांचा मात्र खोळंबा झाला होता.