वॉशिंग्टन : ब्रिटिश अभिनेता बेनाडिक्ट क्युंबरबॅचच्या चाहत्यांसाठी मार्व्हलने आनंदाची बातमी दिली आहे. मार्व्हल स्पायडरमॅन फ्रँचायझीच्या तिसऱ्या चित्रपटात डॉक्टर स्ट्रेंजही झळकणार आहे. या चित्रपटात स्पायडरमॅनची भूमिका टॉम हॉलंड साकारणार आहे.
हॉलिवूड रिपोर्टर वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, या चित्रपटात पीटर पार्करच्या मेंटॉरच्या भूमिकेत डॉ. स्ट्रेंज दिसणार आहे. यापूर्वी 'स्पायडरमॅन : होमकमिंग'मध्ये टोनी स्टार्क/ आयर्न मॅन (रॉबर्ट डाऊनी ज्यु.) हा पीटरच्या मेंटॉरच्या भूमिकेत होता. तसेच, 'स्पायडरमॅन : फार फ्रॉम होम'मध्ये निक फ्युरी (सॅम्युएल एल. जॅक्सन) त्याचा मेंटॉर होता. ही जागा आता डॉ. स्ट्रेंज घेणार आहे.
स्पायडरमॅनच्या तिसऱ्या चित्रपटात आधीच प्रेक्षकांना बरेच सरप्राईझेस मिळणार आहेत. यामध्ये दि अमेझिंग स्पायडरमॅन-२मध्ये दाखवण्यात आलेले इलेक्ट्रो हे पात्रही पुन्हा आणले जाणार आहे. जो हॉलिवूड अभिनेता जॅमी फॉक्स साकारणार आहे. त्यातच आता डॉ. स्ट्रेंजचीही एन्ट्री झाली आहे.
बेनाडिक्ट हा लवकरच डॉ. स्ट्रेंज फ्रँचायझीच्या दुसऱ्या चित्रपटाच्या चित्रीकरणास सुरुवात करणार आहे. 'डॉ. स्ट्रेंज अँड दि मल्टिवर्स ऑफ मॅडनेस' असे नाव असलेल्या या चित्रपटात अल्टर्नेट रिएॅलिटीचे विविध पैलू पहायला मिळणार आहेत. तसेच, हॉरर जॉनरच्या जवळ जाणारा असा मार्व्हलचा हा पहिलाच चित्रपट असल्याचे समजले आहे.
स्पायडरमॅन-३चे चित्रीकरण ऑक्टोबर महिन्यात अटलांटामध्ये होणार आहे. तर, डॉ. स्ट्रेंजच्या दुसऱ्या भागाचे चित्रीकरण या महिन्यात सुरू होण्याची शक्यता आहे. स्पायडरमॅन-३ हा २०२१मध्ये प्रदर्शित करण्याचा निर्मात्यांचा मानस होता, मात्र कोरोना महामारीमुळे आता याची प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली जाणार आहे.
हेही वाचा : जेम्स बाँडने दिला आपल्या उत्तराधिकाऱ्याला सल्ला