मुंबई : साऊथ सुपरस्टार प्रभासचा आगामी चित्रपट 'सालार' या वर्षातील मोस्ट अवेटेड चित्रपटांपैकी एक आहे. हा चित्रपट 28 सप्टेंबरला थिएटरमध्ये दाखल होणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, चित्रपटाचे शूटिंग जवळपास पूर्ण झाले आहे. मात्र, अद्याप प्रभासच्या या चित्रपटाचा कोणताही टीझर किंवा ट्रेलर रिलीज झालेला नाही. प्रभासचे चाहते त्यांच्या बहुप्रतिक्षित चित्रपट, सालारच्या अपडेट्सची वाट पाहत आहेत. तसेच मिळालेल्या माहितीनुसार, सालारचे दिग्दर्शक प्रशांत नील आणि निर्माता विजय किरागांडूर यांनी ट्विटर अकाउंट बंद केले आहे, कारण त्यांना प्रभासच्या चाहत्यांकडून चित्रपटाचे अपडेट्स शेअर करण्यासाठी प्रचंड दबाव येत होता. तसेच यामुळे निर्मात्यांनी 'सालार' या चित्रपटाचे टीझर रिलीजची तारीख सुद्धा लॉक केली आहे. तसेच 'आदिपुरुष'मुळे 'सालार'चे प्रमोशन थांबवण्यात आले आहे. या दोन्ही चित्रपटांमध्ये प्रभास मुख्य भूमिकेत आहे. अशा स्थितीत 'सालार'मुळे 'आदिपुरुष'च्या प्रमोशनमध्ये त्यांना कोणताही अडथळा येऊ नये म्हणूच प्रभासने 'आदिपुरुष' चित्रपट रिलीज होईपर्यंत 'सालार' चित्रपटाचे प्रमोशन करण्यास नकार दिला आहे. मात्र लवकरच प्रभासच्या चाहत्यांना चित्रपटाची पहिली झलक पहायला मिळेल कारण टीम सालार आदिपुरुषसोबत चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्याची योजना आखली आहे. ओम राऊत दिग्दर्शित पौराणिक चित्रपट 'आदिपुरुष'मध्ये प्रभास, क्रिती सॅनन आणि सैफ अली खान प्रमुख भूमिकेत आहेत. हा चित्रपट 16 जून रोजी मोठ्या पडद्यावर दाखल होणार आहेत.
आदिपुरुष चित्रपट : गेल्या वर्षी 2 ऑक्टोबरला जेव्हा 'आदिपुरुष' चित्रपटाचा टीझर रिलीज झाला होता, तेव्हा व्हीएफएक्सच्या दर्जामुळे चित्रपटाला खूप नकारात्मकतेचा सामना करावा लागला होता. या चित्रपटाला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल करण्यात आले. प्रत्येक पात्राची खिल्ली उडवली गेली. सोशल मीडियावर युजर्सच्या प्रतिक्रिया पाहिल्यानंतर निर्मात्यांनी 550 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाची रिलीज डेट वाढवली आणि पुन्हा एकदा चित्रपटाच्या व्हीएफएक्सवर काम सुरू केले. त्याच वेळी, आता निर्मात्यांनी नवीन व्हीएफएक्ससह रामनवमीच्या दिवशी चित्रपटाचा नवीन टीझर रिलीज करण्याचा निर्णय घेतला होता.
सालार चित्रपट : सालार या चित्रपटात श्रुती हासन आणि पृथ्वीराज सुकुमारन हे प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट 28 सप्टेंबर रोजी तेलुगूमध्ये मोठ्या पडद्यावर आणि कन्नड, तमिळ, मल्याळम, हिंदी आणि इंग्रजीमध्ये डब केलेल्या आवृत्त्यांमध्ये प्रदर्शित होणार आहे.