ठाणे - राज्य सरकारने विविध शहरासह ग्रामीण भागातील सर्व सामान्य नागरिकांसाठी मोफत कोरोना लसीकरण गेल्या महिन्यापासूनच सुरु केले. मात्र रोज लसीकरणावरून वाद होताना दिसत आहे. असाच एक वाद समोर आला आहे. लसीकरणाच्या रांगेत उभ्या असलेल्या दोन तरुणी जागेवरुन वाद घालत होत्या. कोरोना लसीकरण केंद्रावर त्या तरुणींमध्ये तुफान हाणामारी झाली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर भलताच व्हायरल झाला आहे.
दोघीमध्ये नंबर वरून वाद
राज्य सरकारने लोकल प्रवास, मॉल, हॉटेल आणि इतरही सार्वजनिक ठिकाणी नागरिकांचे दोन लसीचे डोस घेतले. अशा नागरिकांना प्रवेश दिला जाणार असल्याचे जाहीर केले. त्यातच कोरोनाची तिसरी लाट येण्याच्या शक्यतेने नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. त्यामुळे लसीकरण केंद्रावर लस घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. त्यातच कल्याण डोंबिवली महापालिकेच्या कल्याण पश्चिम येथील होली क्रॉस शाळेतील लसीकरण केंद्रावर शनिवारी सकाळी लस घेण्यासाठी तरुणी रांगेत उभ्या होत्या. अचानक या दोन तरुणीमध्ये नंबरवरून या दोघीमध्ये वाद झाल्याची माहिती लसीकरण केंद्रातील कर्मचाऱ्यांवर दिली.
कर्मचाऱ्यांनी मध्यस्थी केल्याने थांबली हाणामारी
दोघा तरुणीचा वाद एवढा विकोपाला गेला की, काही क्षणातच दोघीमध्ये तुफान हाणामारी झाली. त्यावेळी लसीकरण केंद्रावरील कर्मचाऱ्यांनी मध्यस्थी करत हे भांडण सोडवले. मात्र या तुफान हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर भलताच व्हायरल झाला आहे. याबाबत लसीकरण केंद्रावरील कर्मचाऱ्यांनी कॅमेरासमोर बोलण्यास नकार दिला आहे.
हेही वाचा - महाराष्ट्रातील स्टील कंपनीच्या 44 हून अधिक मालमत्तांवर छापे; 175.5 कोटी रुपयांची बेहिशोबी मालमत्ता जप्त