ठाणे - सुदैवाने ठाणे पूर्व भागात सध्यातरी कोरोनाचा एकही पॉझिटिव्ह रुग्ण आढळलेला नाही. तरीही कोरोनाचा झपाट्याने होत असलेला प्रसार पाहता ठाणे पूर्व भागात कोरोनाचा शिरकाव होणार नाही, याची शाश्वती देता येत नाही. त्यामुळेच या भागात कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी कोपरीमध्ये येणारे सर्व रस्ते ताबडतोब बंद करावेत. हा संपूर्ण भाग सील करावा, अशी आग्रही मागणी स्थानिक नगरसेवक भरत चव्हाण यांनी केली आहे.
हेही वाचा... कल्याण-डोंबिवलीत कोरोनाग्रस्तांचा आकडा 43च्या घरात, तर दोघांचा मृत्यू
कोपरी पोलीस आणि महापालिका प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने राबवलेल्या नियोजनामुळे कोपरीत अद्याप कोरोनाचा एकही रुग्ण आढळून आलेला नाही. मात्र, आगामी दिवसात करोनाचा प्रादुर्भाव होऊ नये, म्हणून कोपरी संपूर्णपणे सील करण्यात यावे. तसेच ठाणे पश्चिम आणि मुंबई येथून येणारी वाहने भाजीविक्रेते आणि नागरिकांना कोपरीत येण्यास मज्जाव करावा, अशी मागणी भरत चव्हाण यांनी केली आहे.
हेही वाचा... मंत्री जितेंद्र आव्हाडांच्या बंगल्यावरील मारहाण प्रकरणी 5 जण वर्तकनगर पोलिसांच्या ताब्यात
कोपरी परिसरातील बरबांगला, सिडको बोगदा, हरिओम नगर आदी सीमा सील करण्यात याव्यात. कोपरी परिसरातील भाजीमार्केटची तीन भागात विभागणी करण्यात आली आहे. मात्र, या ठिकाणी ठाण्याच्या विविध भागातून अनेक भाजीविक्रेते सर्रास येतात. तसेच दुचाकी मोटरकार अशी वाहनेही बाहेरून येतात. बाहेरून येणाऱ्या व्यक्तींच्या मार्फत कोरोनाचा संसर्ग झाला, तर त्याचा नाहक भुर्दंड कोपरीकरांना सोसावा लागेल. त्यामुळे पुढचे काही दिवस कोपरीचा सर्व सीमा बंद कराव्यात, असे नगरसेवक भरत चव्हाण यांनी म्हटले आहे. पालिका आयुक्तांनी देखील या मागणीचा विचार करु असे आश्वासन दिल्याचे आणि गरज पडल्यास योग्य ती पाऊले उचलली जातील, असे आश्वासन दिले आहे.