येवला(नाशिक) : याला जेलमध्ये टाक, त्याला जेलमध्ये टाक असे केल्यापेक्षा चांगली तुम्ही चांगली कामे करा असा टोला अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी भाजपला लगावला आहे. तसेच एखाद्या कार्यक्रमाला किंवा हॉटेलला सरकारने परवानगी दिली म्हणजे तिथे बाकीचे धंदे करा असे सरकार सांगत नाही असेही ते म्हणाले. नाशिकच्या येवला येथे कोरोना आढावा बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
मग मुंद्रा बंदराला का परवानगी दिली?
क्रुझ पार्टीला राज्य सरकारने परवानगी दिल्याच्या मुद्द्यावरून पत्रकारांनी प्रश्न विचारला असता, या पार्टीला कुणी परवानगी दिली हे मला माहिती नाही. मात्र राज्य सरकार हॉटेलला किंवा लॉन्सला परवानगी देते म्हणजे या ठिकाणी बाकीचे धंदे करा असं काही राज्य सरकार सांगत नाही. यात सरकार कसं काय दोषी असू शकतं? असे असेल तर मुंद्रा बंदरावर एवढ्या मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ सापडले तर त्या बंदराला केंद्र सरकारने का परवानगी दिली असा प्रश्न विचारला पाहिजे असेही भुजबळ म्हणाले.
चांगली कामं करा ना
आरोग्यमंत्री राजेश टोपेंची जागा भविष्यात आर्थर रोड जेलमध्ये असल्याची टीका गोपीचंद पडळकरांनी केल्याविषयी पत्रकारांनी विचारले असता, हे सर्व ऑर्डरच सोडत असतात. याला जेल मध्ये, त्याला जेल मध्ये, त्या मंत्र्याला जेलमध्ये. मग हे सांगितल्यावर कुठली ना कुठली यंत्रणा कामाला लागते. त्यापेक्षा तुम्ही चांगलं काम करा ना असा टोला त्यांनी लगावला.
माजी पोलीस आयुक्तही गायब आहेत
गोपीचंद पडळकरांनी झेड प्लस सुरक्षेचा गृहमंत्री कुठे सापडेना अशी टीका केल्याविषयी विचारले असता माजी पोलीस आयुक्तही गायब आहेत. त्यांना पण सुरक्षा असते. तक्रारदारच मुळात गायब आहे असे भुजबळ यावेळी म्हणाले. शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या नाशिक दौऱ्याचेही त्यांनी यावेळी स्वागत केले. ही एक आनंदाची गोष्ट असून विकासाच्या दृष्टीने पुढे अजून काय करता येईल यासाठी हे चांगले आहे असे ते म्हणाले.