मुंबई - सायन रेल्वे स्थानकांदरम्यान रुळांवर पाणी साचल्यामुळे मुलुंडपासून सीएसएमटी दिशेने आणि ठाणेच्या दिशेने जाणारी लोकल सेवा ठप्प झाली आहे. सकाळी 09:38 नंतर एकही लोकल ही सीएसएमटीच्या दिशेने रवाना झाली नाही. याचा फटका अत्यावश्यक सेवेसाठी घराबाहेर पडलेल्या कर्मचाऱ्यांना बसला आहे. फलाटांवर हे कर्मचारी लोकलची वाट पाहत उभे होते. परंतु लोकल सेवा ही अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आली आहे.
हेही वाचा - नाले सफाईवरचा खर्च वाहून गेला, आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांचा आरोप
- ट्रॅकवरील पाणी ओसरल्यानंतर सेवा होणार पुन्हा सुरू -
मध्य रेल्वेने ट्विट करुन यासंदर्भात माहिती दिली आहे. सकाळपासून पाऊस पडत असल्याने कुर्ला आणि सीएसएमटी या रेल्वे स्थानकांदरम्यानच्या रेल्वे ट्रॅकवर पाणी साचले आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून 9 वाजून 50 मिनिटांनी अप मार्गावरील रेल्वेसेवा थांबवण्यात आली. ट्रॅकवरील पाणी ओसरल्यानंतर ही रेल्वे सेवा पुन्हा सुरु करण्यात येईल, असे मध्य रेल्वेच्या जनसंपर्क कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे.
हवामान खात्याच्या अंदाजाप्रमाणे मुंबई आणि उपनगर परिसरात सकाळपासून मुसळधार पावसाला पडत आहे. त्यामुळे मुंबईतील सखल भागांमध्ये देखील पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. कामावर जाण्यासाठी निघालेल्या लोकांची यामुळे तारांबळ उडाली आहे.
- मान्सून मुंबईत दाखल -
आज मान्सून देखील मुंबईत दाखल झालेला आहे. काही दिवसांपूर्वी मान्सून केरळमध्ये दाखल झाला होता आणि त्यानंतर त्याचा वेगाने प्रवास सुरु आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने मुंबईसह कोकणातील सर्व जिल्ह्यात ९ ते १२ जून या चार दिवसांच्या काळात हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिला. या साऱ्याचा परिणाम आजपासूनच मुंबईतील अनेक भागात जाणवू लागला आहे.
हेही वाचा - Mumbai Rains ...तर मुंबईत महाप्रलय येईल, कोस्टल रोडवरून पर्यावरणप्रेमींचा इशारा