नवी दिल्ली - प्रजासत्ताक दिनी आयोजित केलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागले होते. यात जवळपास 300 पोलीस कर्मचारी जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. या संपूर्ण घटनेवरून केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी काँग्रेस नेता राहुल गांधी यांच्यावर टीका केली आहे. हिंसाचाराचा निषेध करणे पुरेसे नाही, तर दोषींना शिक्षा झालीच पाहिजे. हा अपमान देश विसरणार नाही. निवडणुकीत पराभूत झालेली ही सर्व माणसे एकत्र येत, देशातील वातावरण खराब करण्याचा प्रयत्न करीत आहेत, असे जावडेकर म्हणाले.
काँग्रेसने आंदोलनाला हवा दिली. राहुल गांधी यांनी त्यांना पाठिंबा दिला. तसेच त्यांना उकसवण्याचे काम केलं. सीएएवेळीही त्यांनी हेच केलं होतं. काँग्रेसने जाणीवपूर्वक शेतकर्यांना भडकावलं, असे जावडेकर म्हणाले.
काँग्रेस हतबल व निराश आहे. सतत निवडणुकीत पराभव होत आहे. कम्युनिस्टांचीही अशीच अवस्था आहे. काँग्रेसला कोणत्याही मार्गाने देशात अशांतता पसरवायची आहे. भाजपा आणि विशेषत: मोदींची लोकप्रियता आणि यश सतत वाढत आहे. तर काँग्रेस आणि कम्युनिस्टांची कमी होत आहेत. घराणेशाही लोकांनी नाकारली आहे, असे जावडेकर म्हणाले. सरकारने चर्चेच्या 11 फेऱ्या घेतल्या. दीड वर्ष कायदा स्थगित करण्याची तयारी दर्शविली, असेही जावडेकर म्हणाले.
ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण -
केंद्रीय कृषी कायद्यांविरोधात प्रजासत्ताक दिनी आयोजित केलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागले होते. या प्रकरणी पोलिसांनी आता आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यास सुरूवात केली आहे. या हिंसाचारास शेतकरी नेत्यांना जबाबदार धरून त्यांच्यावरही गुन्हे दाखल करण्यास सुरूवात केली आहे. स्वराज इंडिया संघटनेचे अध्यक्ष योगेंद्र यादव, सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर, भारतीय किसान युनियन हरयाणा विभागाचे अध्यक्ष गुरनाम सिंग यांच्यासह ३७ नेत्यांवर दिल्ली पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.