जयपूर: राजस्थान इंटेलिजन्सच्या स्टेट स्पेशल ब्रँचने एक मोठी कारवाई करताना हनी ट्रॅपचा बळी बनून (soldier honey trap case) भारतीय लष्कराच्या सामरिक महत्त्वाची गोपनीय माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून पाकिस्तानी गुप्तचर संस्थेला उपलब्ध करून देणारा प्रदीप कुमार याला अटक करण्यात आली आहे. डीजी इंटेलिजेंस उमेश मिश्रा यांनी सांगितले की, इंटेलिजन्सला असे इनपुट मिळाले होते की, जोधपूर येथील भारतीय लष्कराच्या अत्यंत संवेदनशील रेजिमेंटमध्ये कार्यरत असलेला लष्करी शिपाई प्रदीप कुमार सोशल मीडियाद्वारे पाकिस्तानी गुप्तचर संस्थेच्या सतत संपर्कात आहे.
यावर सीआयडी इंटेलिजन्सने प्रदीप कुमारच्या हालचालींवर बारीक नजर ठेवली आणि यादरम्यान प्रदीप व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून पाकिस्तानी गुप्तचर संस्थेच्या महिला एजंटच्या संपर्कात असल्याचे समोर आले. जे सोशल मीडियाच्या माध्यमातून महिला एजंटला धोरणात्मक महत्त्वाची माहिती शेअर करत आहे. 18 मे रोजी दुपारी प्रदीपला ताब्यात घेऊन जयपूरला आणून चौकशी करण्यात आली. चौकशीनंतर प्रदीपला शनिवारी राज्याच्या विशेष शाखेने अटक केली.
राज्य विशेष शाखेच्या तपासात असे समोर आले की, २४ वर्षीय प्रदीप कुमार ३ वर्षांपूर्वी भारतीय लष्करात रुजू झाला होता आणि प्रशिक्षणानंतर त्याला या पदावर नियुक्त करण्यात आले होते. नंतर प्रदीपची पोस्टिंग अतिसंवेदनशील रेजिमेंट जोधपूरमध्ये झाली आणि सुमारे 7 महिन्यांपूर्वी प्रदीपच्या मोबाईलवर त्या महिलेचा फोन आला. फोन करणार्या महिलेने तिचे नाव रिया आहे तसेच ती मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर येथील रहिवासी असुन सध्या बंगळुरूमध्ये मिलिटरी नर्सिंग सर्व्हिसेसमध्ये कार्यरत आहे असे सांगितले.
यानंतर पाकिस्तानी महिला एजंटने प्रदीपला हनी ट्रॅपमध्ये अडकवले आणि त्याच्यासोबत व्हॉट्सअॅपवर चॅटिंग, व्हॉईस कॉल आणि व्हिडिओ कॉल सुरू केले. पाकिस्तानी महिला एजंटने प्रदीपला दिल्लीत भेटून लग्न करण्याच्या बहाण्याने लष्कराशी संबंधित गोपनीय कागदपत्रांचे फोटो मागायला सुरुवात केली. हनीट्रॅपमध्ये अडकलेल्या प्रदीपने आपल्या कार्यालयातून लष्कराशी संबंधित गोपनीय कागदपत्रांचे फोटो पाकिस्तानी महिला एजंटला तीच्या मोबाइलवरून चोरून पाठवण्यास सुरुवात केली.
विशेष शाखेने केलेल्या तपासात हे तथ्यही समोर आले आहे की, प्रदीपने त्याचा सिमकार्ड मोबाईल नंबर पाकिस्तानी महिला एजंटसोबत शेअर केला होता आणि त्या नंबरवर व्हॉट्सअॅप ऍक्टिव्हेट करण्यासाठी तिच्या मोबाईलवर मिळालेला ओटीपी दिला. त्यामुळे पाकिस्तानी महिला एजंटने भारतीय सिम क्रमांकाच्या आधारे व्हॉट्सअॅप अकाउंट बनवले आणि चालवले. पाकिस्तानी महिला एजंटने प्रदीपचा मोबाईल नंबर वापरून सक्रिय केलेल्या व्हॉट्सअॅप अकाउंटद्वारे इतर लष्करी जवानांना आपला बळी बनवला आहे का, याचाही तपास सुरू आहे. यासोबतच ऑफिशियल सिक्रेट्स अॅक्ट 1923 अंतर्गत गुन्हा दाखल करून प्रदीपला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी प्रदीपची सतत चौकशी सुरू असून, त्यात आणखी काही खुलासे होण्याची शक्यता आहे.