फिरोजपूर - सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) पंजाबात पाकच्या ड्रोन्सच्या हालचाली दिसून आल्याची माहिती दिली आहे. फिरोजपूरमधील हुसैनवाला सेक्टर येथे पाकची अनेक ड्रोन्स आढळून आली आहेत. ही ड्रोन्स भारतावर हल्ले करण्यासाठी आणि टेहळणीसाठी वारंवार सीमेपलीकडून पाठवली जात असल्याचे बीएसएफने सांगितले आहे.
सोमवारी रात्री उशिरा या परिसरात मोठ्या संख्येने ड्रोन्स नजरेस पडल्याचे सांगण्यात आले आहे. बीएसएफच्या सूत्रांनुसार, गस्त पथकांनी या ड्रोन्सवर गोळीबार केला. पाकिस्तानकडून ही ड्रोन्स पाठवली जात असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली आहे.
यापूर्वीही अनेकदा अशी ड्रोन्स नजरेस पडली आहे. पाकिस्तानकडून ड्रोन्सद्वारे दहशतवाद्यांना हत्यारे, रायफल्स, दारूगोळा पुरवला जात असल्याची माहिती समोर आली आहे. लष्करासह सर्व सुरक्षा दलांना अनोळखी ड्रोन या प्रदेशात दिसल्यास ती पाडण्याचे आदेश दिले आहेत.
सुरुवातीला हुसैनवाला सेक्टरमध्ये रात्री साडेदहा वाजता पहिले ड्रोन दृष्टीस पडले, असा दावा सूत्रांनी केला आहे. याआधी या भागात सर्वांत पहिले ड्रोन ९ ऑक्टोबरला दिसले होते. या ड्रोन्सच्या हालाचाली पाहिल्यानंतर त्याविरोधात पंजाब पोलिसांकडून शोध मोहीमही सुरू करण्यात आली होती.