VIDEO : CDS बिपिन रावत यांचा जवानांना अखेरचा व्हिडिओ संदेश.. मृत्यूच्या एक दिवस आधी केला होता रेकॉर्ड
भारताचे पहिले चीफ ऑफ डिफेंस स्टाफ (सीडीएस) जनरल बिपिन रावत आता आपल्यात नाहीत. मात्र त्यांच्याशी संबंधित अनेक आठवणी समोर येत आहेत. असाच एक व्हिडिओ संदेश भारतीय लष्कराकडून प्रसिद्ध करण्यात आला आहे. हा व्हिडिओ सात डिसेंबर रोजी रेकॉर्ड केला गेला होता. दिवंगत सीडीएस जनरल बिपिन रावत यांचा रिकॉर्डेड व्हिडिओ संदेश दिल्लीतील इंडिया गेट लॉनमध्ये दाखवण्यात आला. 'स्वर्णिम विजय पर्व' निमित्त आयोजित एका कार्यक्रमात सीडीएस रावत यांचा संदेश दाखविण्यात आला. सीडीएस रावत यांनी भारतीय लष्कराच्या जवानांना शुभेच्छा देताना म्हटले होते, की 1971 च्या लढाईत भारतीय सेनेला मिळालेल्या विजयाचा 50 वा वर्धापनदिन विजय पर्वच्या रुपात साजरा केला जात आहे. या दिनानिमित्त सशस्त्र दलाच्या वीर जवानांच्या बलिदानाला श्रद्धांजली अर्पण करतो. रावत यांनी सांगितले की, 12 ते 14 डिसेंबर पर्यंत इंडिया गेट वर अनेक कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. सीडीएस रावत यांनी शहीदांच्या स्मृतीप्रित्यर्थ स्थापन करण्यात आलेल्या अमर जवान ज्योतिच्या मशालीसमोर विजय पर्वाचे आयोजन करणे खूपच भाग्याचे असल्याचे म्हटले. त्यांनी सर्व देशवासीयांना या उत्सवात सामील होण्याचे आवाहन केले होते. रावत यांनी म्हटले होते की, 'अपनी सेनाओं पर है हमें गर्व, आओ मिलकर मनाएं विजय पर्व' भारतीय सैन्यदलासाठी चार दशकाहून अधिक काळ सेवा देणाऱ्या बिपिन रावत यांनी आपल्या संदेशाचे समापण 'जय हिंद' बोलून केले होते.