अमरावतीच्या मध्यवर्ती खुल्या कारागृहात पोळा साजरा; बंदीजनांनी केली सर्जा-राजांची मनोभावे सजावट
अमरावती - शेतकऱ्यांचा सण म्हणून पोळा सणाची ओळख आहे. त्यामुळे दरवर्षी शेतकरी पोळा सण उत्साहात साजरा करत असतात. मात्र, मागील वर्षी प्रमाणे यंदाही कोरानाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना आपला हक्काचा पोळा सण साध्या पद्धतीने साजरा करावा लागला. अमरावतीच्या मध्यवर्ती खुल्या कारागृहात पोळा सणाची जोरदार तयारी सुरू होती. सोमवारी पहाटेपासूनच कारागृहातील बंदी जणांनी आपल्या बैलांना स्वच्छ धुऊन त्यांना चारा चारण्यासाठी नेले होते. खुल्या कारागृह प्रशासनाची वीस एकर शेती आहे आणि या शेतीची मशागत या बैलांद्वारे केली जाते. जवळपास सहा बैल कारागृह प्रशासनाने जवळ आहे. त्यामुळे दरवर्षी पोळा सणाला या बैलांचे पूजन करून त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली जाते. कारागृह प्रशासनाकडे 6 गाई तसेच 70 शेळ्या व इतर तीन जनावरे याच्या माध्यमातून खुल्या कारागृहाची शेती केली जाते. दरम्यान, सोमवारी दरवर्षीप्रमाणे ही पोळा सण या कारागृहात साजरा केला गेला.