अमरावती जिल्ह्यात एकाच घरात आढळली कोब्रा सापाची 22 पिल्ले
अमरावती- पावसाळ्यात घरात किंवा आजुबाजुला एखादा लहान मोठा साप निघणे ही बाब सामान्य असू शकते, परंतु एकाच घरात तब्बल २२ जहाल विषारी कोब्रा साप आढळल्याची घटना समोर आली आहे. जिल्ह्यातील उत्तमसरा येथे एका घरात तब्बल २२ कोब्रा जातीच्या सापाचे पिल्ली आढळून आली आहेत. त्यानंतर वन्यजीव मित्रांच्या मतदतीने या सापांच्या पिलांना पोहरा जंगल परिसरात सोडण्यात आले. उत्तमसरा येथील मंगेश सायंके हे कुटुंबासह काही दिवसांकरिता बाहेरगावी गेले होते. गुरुवारी परतल्यानंतर त्यांना घराच्या दाराजवळ त्यांना सापाची कात आढळली. त्याकडे दुर्लक्ष करीत ते दैनिक कार्यात मग्न झाले. गुरुवारी सायंकाळी अंथरूण टाकत असताना त्यामधून एक सापाचे पिल्लू निघाल्याचे आढळून आले. त्यामुळे त्यांनी तत्काळ वसा संस्थेचे ॲनिमल्स रेस्क्यूअर भूषण सायंके यांना माहिती देऊन बोलावून घेतले. त्यानंतर त्यांनी त्या नागाला पकडून सुरक्षित अधिवासात सोडून दिले. मात्र, शुक्रवारी सकाळी आणखी दोन सापांची पिल्ले आढळून आले. त्यामुळे त्यांना रेस्क्यू करत असताना एकूण २२ पिले आढळून आली. या पिलांची वनविभागाकडे नोंद करून त्यांना सुरक्षित अधिवासात सोडण्यात आले आहे.