Heavy Rain In Vasai Virar : वसई, विरार पुन्हा एकदा जलमय; 50 कुटुंबांचे स्थलांतर
पालघर (विरार) : गेल्या 48 तासांपासून कोसळत असलेल्या पावसाने पालघर जिल्ह्यातील वसई, विरार, नालासोपारा शहरात दानादान उडविली आहे. रस्ते परिसरात गुडघाभर पाणी साचल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. वसई, नालासोपारा, अर्नाळा, चंद्रपाडा, गास गाव, सेन्ट्रल पार्क, गाला नगर, जया पॅलेस, सनसिटी या भागात पाणी साचल्याने सर्वसामान्य नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्यामुळे शहरातील वाहतूक पूर्णपणे ठप्प आहे. तसेच अनेक वाहने बंद पडली आहेत. शहरातील रहिवाशी संकुल व दुकानांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांचे व व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या ठिकाणी नागरिकांच्या सुरक्षेसाठी कोणतेही प्रशासन सज्ज नाही. मुंबई-अहमदाबाद महामार्गाच्या शेजारी असलेला नालासोपारा येथील सर्व्हिस रस्ता पाण्याखाली गेला आहे. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडून त्याला तलावाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. गेल्या २४ तासात वसईत २०४ मिमी, मांडवीत १७५ मिमी, विरारमध्ये १९१ मिमी, पेल्हार २२५ मिमी, माणिकपूर २२६ मिमी निर्मळ १२१ मिमी, आगाशी १९४ मिमी, बोळींज १९१ मिमी, कामण २०५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. आतापर्यंत एकूण १७३२ मिमी पावसाची नोंद झाली आहे. विरारच्या कातकरी वाडीतील १५ लोक, खाडी पाड्यातील १२ कुटुंबातील ६९ लोकांना जिल्हा परिषदेच्या शाळेत काल सोडण्यात आले होते. त्यांच्या जेवणाची सोय त्याच ठिकाणी करण्यात आली आहे आणि कातकरी वाडीतील १५ लोक त्यांच्या घरी पुन्हा गेली आहेत. चंद्रपाड्यातील ३० कुटुंबातील ८२ लोकांना आरडीएम हायस्कूलमध्ये स्थलांतरित करण्यात आले आहेत.