MLA Sandeep Kshirsagar Dance : ...अन् आमदार संदीप क्षीरसागरांनी धरला भीमगीतावर ठेका; पाहा व्हिडिओ
बीड: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 132वी जयंती काल(शनिवारी) बीडमध्ये जल्लोषात पार पडली. या निमित्ताने आमदार संदीप क्षीरसागर यांनी भीमगीतांचा कार्यक्रम अनुयायांसाठी आयोजित केला. ज्यात सुप्रसिद्ध गायक आदर्श शिंदे यांनी एकाहून एक सरस भीमगीते सादर केली. छत्रपती संभाजी महाराज क्रीडा संकुलनात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला अनुयायांनी तुफान गर्दी केली होती. यावेळी सर्वच भीम अनुयायांनी मोबाईल टॉर्च लावून बाबासाहेबांना अभिवादन केले. विशेष म्हणजे, भीमगीत सुरू असतानाच आमदार संदीप क्षीरसागर यांनी गीतांवर नृत्याचा ठेका धरला. दरम्यान डोळ्याचे पारणे फिटतील, असे मनमोहक दृष्ये ड्रोन कॅमेऱ्यात कैद झाली आहेत.
महापुरुषांच्या जयंतीला कार्यक्रमाची मेजवानी: बीड जिल्ह्यात महापुरुषांच्या जयंती निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन बीड मतदारसंघाचे आमदार संदीप क्षीरसागर हे करत असतात. छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती, त्याचबरोबर गुरु रविदास महाराज यांची जयंती, ही बीड शहरांमध्ये अनोख्या पद्धतीने साजरी करण्यात आली. देशाच्या बाहेरच्या कलाकारांना बोलावून बीडकरांसाठी आगळीवेगळी मेजवानी छत्रपती शिवजयंती निमित्त या ठिकाणी पाहायला मिळाली;
'या' गीतावार धरला ठेका: जयंतीनिमित्त सुप्रसिद्ध गायक आदर्श शिंदे यांच्या भीमगीत गायनाचा प्रेक्षकांनी आनंद लुटला. याच विविध गाण्यांना महिला, मुली, तरुणांनी अबालवृद्धांनी टाळ्या वाजवून प्रतिसाद दिला. यावेळी मतदारसंघाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनीही 'राजा राणीच्या जोडीला पाच मजली माडीला, आहे कुणाचे योगदान लाल दिव्याच्या गाडीला' या गाण्यावर ठेका धरला. त्यामुळे तरुणाईमध्ये आणखीच उत्साह वाढलेला पाहायला मिळाला. बीड शहरातील प्रेक्षकांनी छत्रपती संभाजी राजे स्टेडियम खचाखच भरलेले होते.