हैदराबाद - पौगंडावस्था ही प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातील नाजुक कालखंड असतो. या वयात व्यक्तीमध्ये भरपूर सकारात्मकता व प्रभावीपणा असतो. या वयात किशोरवयीन मुला-मुलींना बऱ्याच गोष्टी करून पहायच्या असतात. ते या वयात स्वत:बद्दल आणि इतरांबद्दल आपली अशी स्वतंत्र मते बनवण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्या वयोगटातील मुलांचा प्रभाव त्यांच्यावर असतो. म्हणूनच त्या वयातली मुले आपल्या मित्रमैत्रिणींप्रमाणेच शिकू पाहतात, अनुभव घेतात आणि त्यांचेच अनुकरण करतात. या मुला-मुलींना सेलिब्रिटी आणि मॉडेलचे अनुकरण करणे आवडते. त्यांना त्यांच्या मित्र-मैत्रिणींमध्ये लोकप्रिय व्हायचे असते. कारण, त्यांना आपल्या ग्रुपमध्ये स्वत:ची ओळख हवी असते.
पौगंडावस्था आणि या वयातील मुलांबाबत ई टीव्ही भारत सुखीभवच्या टीमने मुंबईमधील बोरिवलीस्थित 'प्रफुल्ल सायकॉलॉजिकल वेलनेस सेंटरच्या' करियर समुपदेशक आणि माइंडसाइटच्या मानसोपचार तज्ज्ञ आणि प्ले थेरपिस्ट काजल यु. दवे यांच्याशी बातचीत केली. त्यांनी काही टिप्स दिल्या आहेत.
समजा आपण टीनेजरला विचारले की तुला तुझ्यात काय बदल हवा आहे? त्यावर त्यांचे ताबडतोब उत्तर असेल ‘माझी फिगर’. काहींना चांगली शरीरयष्टी हवी असते तर काहींना सपाट पोट. काहींना झिरो फिगर हवी असते. मग, या सर्व अपेक्षा ठेवणे चुकीचे आहे का? अजिबातच नाही. पण यासाठी एखाद्याने आपल्या शरीराला किती त्रास द्यायचा, हे ठरवायला हवे. अनेकदा आपण ऐकतो टीनएजरने क्रॅश डाएट घेतले किंवा अति व्यायाम केला. हे सर्व खूप काळजीपूर्वक केले नाही, तर शरीराला अपाय होऊ शकतो. अजून एक प्रश्न खरोखर कुणाच्या प्रभावाखाली येऊन इतके सगळे टीनेजरनी करावे का? याचे उत्तर सरळ आहे. आपण एक व्यक्ती म्हणून आपल्याकडे कसे पाहतो, आपण स्वत:बद्दल काय विचार करतो, यावर हे अवलंबून आहे.