मुंबई : एखादे संकट उद्भवल्यावर सर्वात अगोदर आठवण केली जाते ती देवाची. कुठलही संकट असो त्या संकटापासून दूर करण्यासाठी देव-देवतांना नवस केले जातात. पूजा-अर्चा केली जाते. परंतु तुम्ही असे कधी ऐकलं आहे का? की बदलत्या हवामानाने किंवा काही विविध आजारांने होणारा खोकला दूर करण्यासाठी, खोकला देवीची पूजाअर्चा केली जाते. तिला नवस बोलला जातो. हो हे खरे आहे. काही ठराविक भाविकांना हे ठाऊक आहे. त्यांचद्वारे याची प्रचिती आता वाढत आहे. मुंबईतील प्रसिद्ध प्रभावती देवी मंदिरात परिसरात ही खोकला देवी विराजमान असून मीठ, पीठ याने तिची ओटी भरल्याने कितीही जुन्यातला जुना खोकला दूर होतो अशी भाविकांची श्रद्धा आहे.
मंदिराला तीनशेहून अधिक वर्षांचा इतिहास : मुंबईत अनेक देवी देवतांची मंदिर आहेत. त्यापैकी काही फार प्रसिद्ध आहेत. तर काही स्थानिक पातळीवर त्या -त्या मंदिराची काही खास वैशिष्ठ आहेत. असेच मुंबईतील प्रभादेवी परिसरात असलेले प्रभावती देवीचे फार प्रसिद्ध मंदिर आहे. प्रभावती मंदिराला तीनशेहून अधिक वर्षांचा इतिहास आहे. मंदिरात प्रभावती देवी, कालिका देवी, चंडिका देवी अशा तीन देवींच्या मुर्त्या आहेत. प्रभावती देवी अनेक ज्ञाती समाजांची कुलदेवता असल्याने नवरात्रीनिमित्त नऊ दिवस देवीची ओटी भरण्यासाठी मंदिरात दूरवरून भाविक येत असतात. जानेवारीमध्ये शाखंभरी पौर्णिमेला मंदिरात जत्रा भरते. त्या वेळेस हजारो भाविक दर्शनासाठी येत असतात.
मुंबईकरांची कुलस्वामिनी : मंदिराला तीनशे वर्षापेक्षा जास्त इतिहास असल्या कारणाने मंदिरांमध्ये परंपरेनुसार पिढ्यान पिढ्या भाविक येत आहेत. अनेक मुंबईकरांची ही कुलस्वामिनी आहे. जागेच्या अभावाने, कौटुंबिक कारणाने किंवा इतर काही निमित्ताने भक्तगण प्रभादेवी पासून दूरवर गेले असले तरीसुद्धा वर्षातून एकदा तरी ते या कुलस्वामिनीच्या दर्शनाला आवर्जून येत असतात. तसेच प्रभादेवी मातेला बोललेला नवस पूर्ण होतोच अशी या भाविकांची श्रद्धा आहे.
खोकला होतो बरा : प्रभावती देवीचे दर्शन घेऊन मंदिर परिसरात असलेल्या खोकला देवीचं दर्शन घेण्यासाठी जेव्हा भाविक येतात तेव्हा या देवीचे वेगळे असे महत्त्व त्यांना समजते. प्रथमच या मंदिरात येणाऱ्या भक्तांना खोकला देवी विषयी ऐकून आश्चर्यच वाटते. परंतु जेव्हा इकडचे स्थानिक किंवा अनुभवी भक्तगण या खोकला देवीची माहिती नवीन भक्तगणना देतात तेव्हा त्यांची देवीवरील श्रद्धा दिसून येते. मग तो कुठल्याही प्रकारचा खोकला असू दे. सुखा खोकला, ओला खोकला, डांग्या खोकला, दम्याचा खोकला, कितीही जुन्यातला जुना खोकला असू दे व कितीही मोठ्यातल्या मोठ्या डॉक्टरांकडून केलेल्या औषधोपचाराने तो बरा होत नसेल तर भाविकांनी खोकला देवीला नवस करायचा. पीठ, मीठाने देवी मातेची ओटी भरायची खोकला बरा होतो, असे अनुभव आलेले भाविक सांगतात. ही गोष्टच खोकलादेवीबद्दलची उत्सुकता अधिक वाढवते. बाराव्या शतकात त्या वेळी मुंबईच्या बेटावर राज्य करणारा राजा बिंब यांची प्रभावती देवी ही कुलस्वामिनी. त्यांचे प्रधान गंभीरराव सूर्यवंशी यांची कुलदेवता कालिका देवी, पुरोहित हेमाडपंतांची कुलदेवता चंडिका देवी यांची प्रभावती देवीसह स्थापना करण्यात आली.
Khokla Devi : खोकला देवीची पीठ व मिठाने ओटी भरल्यास बरा होतो 'हा' आजार; भाविकांची श्रद्धा
खोकला देवीची पीठ, मिठाने ओटी भरल्यास खोकला बरा होतो असा भक्तांचा अनुभव आहे. या देवीची कोणतीही पूजा-अर्चा केली जात नाही. तसेच या देवीला नवससुद्धा केले जात नाही. देवीची ओटी भरल्याने जुन्यातील जुना खोकला बरा होतो अशी भाविकांची श्रद्धा आहे.
खोकला देवी
Last Updated : Feb 17, 2023, 7:58 AM IST