यवतमाळ -विदर्भातील राष्ट्रवादी काँग्रेसचा एकमेव गड असलेल्या पुसद मतदारसंघात भाजपने कमळ फुलवण्याच्या इराद्याने जोरदार तयारी केली आहे. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आमदार मनोहर नाईक यांचे कनिष्ठ चिरंजीव इंद्रनील नाईक यांच्या विरोधात भाजपचे विधान परिषद सदस्य आमदार निलय नाईक यांना निवडणूक रिंगणात उतरवून नाईक घराण्यातच संघर्ष उभा केला आहे. शिवसेनेकडून भाजपने ही जागा स्वतःकडे मागून घेतली आहे. त्यामुळे नाईक घराण्यातील इंद्रनील मनोहर नाईक व निलय मधुकर नाईक या दोन चुलत बंधूतील ही लढत अत्यंत चुरशीची होईल.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या मर्जीतील आमदार मनोहर नाईक यांनी पुसद मतदारसंघात राष्ट्रवादीचा झेंडा सतत उंच ठेवला आहे. मागील विधानसभा निवडणुकीत भाजपने मुसंडी मारल्याने विदर्भात काँग्रेस आणि राष्ट्रवादीची मोठी पडझड झाली. परंतु, पुसदमध्ये मात्र राष्ट्रवादीचे मनोहर नाईक हे ६५ हजार मतांनी निवडून आले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे ते विदर्भातील एकमेव आमदार आहेत. पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीपासून आजतागायत पुसद विधानसभा मतदारसंघावर नाईक घराण्याचे कायम वर्चस्व राहिले आहे. माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक, माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक व विद्यमान आमदार मनोहर नाईक या जनाधार असलेल्या नेत्यांनी पुसदचे सातत्याने नेतृत्व केले. आता आमदार मनोहर नाईक यांनी स्वतः निवडणूक रिंगणात न उतरता कार्यकर्ते, मतदारांचा कानोसा घेत कनिष्ठ चिरंजीव इंद्रनील नाईक यांना पुढे केले आहे.
हेही वाचा... दिग्रस आणि आर्णी मतदार संघात भाजपची बंडखोरी
निवडणुकांची धुमश्चक्री सुरू होताना इंद्रनील नाईक यांनी शिवबंधन बांधण्याची तयारी केली होती. परंतु, शरद पवार यांच्याशी असलेल्या स्नेहपूर्ण संबंधामुळे व कार्यकर्त्यांचा कल लक्षात घेत मनोहर नाईक यांनी इंद्रनील नाईक यांना 'सिग्नल' दिला नाही. भाजपमधील वाढत्या इन्कमिंग नंतर खुद्द मुख्यमंत्र्यांनी इंद्रनील यांना उमेदवारी व मंत्रिपदाच्या 'रेड कार्पेट'चे आश्वासक शब्द दिल्याचे बोलले जात होते, मात्र राष्ट्रवादीत राहण्याची भूमिका मनोहर नाईकांनी घेतली.