यवतमाळ - जिल्ह्यात शहरी भागासोबतच तालुक्यातसुध्दा कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांचा त्वरीत शोध घेऊन त्यांची तपासणी करणे आवश्यक आहे. तसेच लक्षणे असलेल्या नागरिकांपासून इतरांना प्रादुर्भाव होऊ नये म्हणून त्यांना ग्रामीण रुग्णालय, डीसीएचसी, सीसीसीला त्वरीत भरती करण्यासाठी अतिरिक्त बेडचे नियोजन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिले.
कोविड केअर सेंटर व ग्रामीण रुग्णालयाला भेट
झरी तालुक्यातील पाटण येथील कोविड केअर सेंटर व ग्रामीण रुग्णालय येथे भेट देऊन जिल्हाधिका-यांनी तालुकास्तरीय समितीची बैठक घेतली. कोविड बाबतच्या प्रतिबंधक सुचनांची कडक अंमलबजावणी करा. नगर पंचायत इमारतीमधील सीसीसीमध्ये अतिरिक्त बेड वाढवण्याचे आदेश त्यांनी यावेळी दिले.
पाटण येथे 50 ऑक्सिजन बेड व झरी येथील ग्रामीण रुग्णालयात 15 ऑक्सिजन बेड तयार करण्यासाठी तत्काळ प्रस्ताव सादर करा. तालुक्यातील गावांमध्ये ग्रामस्तरीय समित्या सक्रीय करून टेस्टिंग वाढविणे, मृत्युदर कमी करण्यासाठी प्रयत्न करणे आदी सुचना त्यांनी दिल्या.