यवतमाळ-वेकोलीच्या वणी उत्तर क्षेत्रातील कोलरपिंपरी कोळसा खाणीत सुरू असलेल्या रोडसेलमध्ये प्रचंड अनागोंदी कारभार सुरू आहे. एक हजार टन कोळशाच्या अफरातफरी प्रकरणी झालेल्या तक्रारीअंती केंद्रीय गुन्हे अन्वेषण (सीबीआय) व दक्षता (व्हिजिलन्स) विभागाच्या अधिकाऱ्यांनी कोलरपिंपरी कोळसा खाणीत धाडसत्र सुरू केले आहे. कोळशाच्या होत असलेल्या अनागोंदी प्रकाराबाबत चौकशी सुरू केली आहे. या धाडीबाबत वेकोली उत्तर क्षेत्राचे महा प्रबंधक ईश्वरदास जक्यानी यांना विचारणा केली असता त्यांनी कारवाईला दुजोरा दिला आहे.
अधिकाऱ्यांचे संगनमत असल्याची शक्यता
काही दिवसांपूर्वी 968 टन कोळशाची अफरातफर झाली होती. या प्रकरणी नियमाला बगल देत अल्प दंडात्मक कारवाई करण्यात आली. तर रोडसेलसाठी कोळसा उचलताना चांगल्या प्रतीचा कोळसा ट्रकद्वारे वाहून नेण्यात येत आहे. डीओ धारकाची मनमानी व अधिकाऱ्यांचे संगनमत याला कारणीभूत असून उच्च प्रतीच्या कोळशाची होत असलेली नियमबाह्य उचल यामुळे वितरणाचे 'टार्गेट' पूर्ण होत नाही.