यवतमाळ - वाशिम मतदारसंघात वाशिमचे पालकमंत्री तथा महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांचा ट्रॅक्टर चालवतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. भाजपचे बंडखोर अपक्ष उमेदवार पी. बी. आडे यांचे 'ट्रॅक्टर' हे मतदान चिन्ह आहे. पी. बी. आडे आणि संजय राठोड हे दोघेही बंजारा समाजाचे आहेत. त्यामुळे व्हॉट्सअॅप ग्रुपवर हा व्हिडिओ झपाट्याने व्हायरल होत आहे.
संजय राठोड यांनी चालवला 'ट्रॅक्टर', यवतमाळमध्ये राजकीय चर्चांना उधाण
संजय राठोड यांनी अपक्ष उमेदवार पी.बी. आडे यांचे ट्रॅक्टर हे बोधचिन्ह असलेले वाहन चालविल्याने सेनेच्या उमेदवार भावना गवळी यांच्या विरोधात राठोड हे काम तर करीत नाही ना, अशी चर्चा यवतमाळ-वाशिम मतदारसंघात सुरू आहे
या संदर्भात संजय राठोड यांची प्रतिक्रिया घेतली असता, त्यांनी हा व्हिडिओ जुना असून हा व्हिडिओ व्हायरल झाला असला तरी जनता सुज्ञ आहे, असे सांगितले. मी केवळ युतीचाच प्रचार करत असल्याचा दावाही त्यांनी केला. यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघासाठी शिवसेनेकडून भावना गवळी उमेदवार आहेत. मागील दोन-तीन वर्षांपासून भावना गवळी आणि संजय राठोड यांचे विळा-भोपळ्याचे सख्य आहे. त्यामुळे पी. बी. आडे यांना जाहीर पाठींबा तर त्यांचे बोधचिन्ह असलेल्या ट्रॅक्टर चालवून देत नाहीत, अशी चर्चा या मतदारसंघात सुरू आहेत.
त्याचबरोबर भाजपचे बंडखोर उमेदवार पी.बी. आडे यांना भाजपचा छुपा पाठींबा आहे. त्यामुळे संजय राठोड यांनी अपक्ष उमेदवार पी.बी. आडे यांचे ट्रॅक्टर हे बोधचिन्ह असलेले वाहन चालविल्याने सेनेच्या उमेदवार भावना गवळी यांच्या विरोधात राठोड हे काम तर करीत नाही ना, अशी चर्चा यवतमाळ-वाशिम मतदारसंघात सुरू आहे.