महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Dec 13, 2019, 1:40 PM IST

ETV Bharat / state

वास्तववादी परिस्थितीवर कवितेतून फोडली वाचा; पोलीस वर्दीतील कवी मनाचा उद्रेक

शेंबाळपिंपरी येथे पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले शिवाजी देशमुख हे कवितेतून स्वत:ला व्यक्त करतात. त्यांनी वास्तववादी परिस्थितीवर आपल्या कवितेच्या माध्यमातून वाचा फोडली आहे.

yavatmal
शिवाजी देशमुख

यवतमाळ - कवित्व जपायला हळवे मन आणि इतरांप्रती संवेदना, आस्था असायला हवी. तरच वास्तवावर हल्ला करण्यासाठी शब्दाचे बाण होऊन व्यवस्थेचा लेखाजोखा मांडता येतो.

पोलीस वर्दीतील कवी
कर्तव्यावर असताना पोलिसांना परिस्थितीनुसार भावनांना आवार घालून काम करावे लागते. तरीही गणवेशाच्या आत तो एक माणूसच असतो. याचाच प्रत्यय या कवीमनाच्या पोलीस बांधवाकडून अधोरेखीत केला गेला आहे. शेंबाळपिंपरी येथे पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले शिवाजी देशमुख हे कवितेतून स्वत:ला व्यक्त करतात. त्यांनी वास्तववादी परिस्थितीवर आपल्या कवितेच्या माध्यमातून वाचा फोडली आहे.

अहोरात्र अभ्यास करुनी, माझी प्रियांका मुक्या जनावरांची सेवा करण्यात मग्न होती...
त्या काळोख रात्री आमच्या दारावर अशी कडू बातमी का आली होती,
अशा घृणास्पद बेईमान विचाराचे बीजं आमच्या मातीत कशी पैदा झाली होती...
त्यांनी तर माझ्या हरिणीचा पाठलाग करून,
तिचे लचके तोडिले होते... तिचे लचके तोडिले होते...!

हैदराबाद येथे एका डॉक्टर तरुणीवर झालेला अमानुष बलात्कार आणि हत्येच्या संपूर्ण देशात संतापाची लाट आली होती. तिच्या कुटुंबावर झालेला आघात अन तिच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी ही माणुसकीच्या दृष्टीकोनातून शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न देशमुख यांनी त्यांच्या या कवितेतून केला होता.

त्याचप्रकारे, देशभरातील शेतकरी जे राबराब राबतात, परिस्थितीचा सामना करत स्वत:च्या रक्ताचे पाणी करून पीक घेतात. दरम्यान त्यांना येणाऱ्या अडचणी आणि व्यथा देशमुख यांनी त्यांच्या कवितेतून मांडल्या आहेत.

जगाचा पोशिंदा असला तरी,
माझा शेतकरी राजा दुर्लक्षित आहे...
कधी अस्मानी तर कधी सुल्तानी संकटांनी हा नडला जात आहे.

स्त्री भृण हत्यासारख्या गंभीर विषयांवरही त्यांनी आपल्या शब्दातून व्यथा मांडल्या आहेत. सर्वसामान्य कविता असलेले शृंगार व आभासी झोपाळ्यावर हिंदोळे न घेता वास्तवातील नकारात्मक स्थिती कवितांच्या माध्यामातून प्रस्तुत करत पोलीस वर्दीतील कवित्व त्यांनी जपले आहे. लवकरच त्यांचा एक काव्यसंग्रह प्रकाशित करण्याचा मानस आहे.

हेही वाचा -टिचभर पोटासाठी तो करतोय 'हे' काम, हात होतात रक्तबंबाळ

हेही वाचा - यवतमाळ बाजार समितीमध्ये 14 हजार क्विंटल कापूस खरेदी; शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण

ABOUT THE AUTHOR

...view details