महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

उमरखेड : प्रत्येकवेळी दुसऱ्याला संधी देणारा विधानसभा मतदारसंघ

यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड विधानसभा मतदार संघात मतदारानी प्रत्येक वेली वेगळ्या उमेदवाराला संधी दिली आहे. या मतदारसंघात अपवाद वगलता सलग दोनवेळा कोणालाही विधानसभा निवडणूक जिंकता आलेली नाही.

उमरखेड विधानसभा मतदार संघ

By

Published : Sep 21, 2019, 2:36 PM IST

यवतमाळ -मतदारसंघात मागच्या सत्तेचाळीस वर्षाच्या राजकारणात कुठल्याही आमदाराला सलग दुसऱ्यांदा मतदारसंघातून विधानसभेवर जिंकून जाता आलेले नाही. म्हणजेच हा मतदारसंघ कधीच आपला प्रतिनिधी रिपीट करत नाही. दरवेळी जनतेने वेगळ्या व्यक्तीला निवडून दिले आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत जनतेचा कौल कोणाला राहतो, इतिहासाची पुनरावृत्ती यंदाही कायम राहते याची सर्वांना उत्कंठा आहे.

उमरखेड विधानसभा मतदार संघ

उमरखेड विधानसभा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. या मतदारसंघात महागाव, उमरखेड आणि ढानकीसह काही काही छोट्या मोठ्या 170 पेक्षा जास्त गावांचा सामावेश आहे. उमरखेड विधानसभा मतदारसंघाचा समावेश हिंगोली लोकसभा मतदारसंघात होतो. महाराष्ट्राच्या विदर्भ आणि मराठवाडा या दोन प्रादेशिक विभागांना हा मतदारसंघ जोडतो. शेती हा मतदारसंघातील जनतेचा प्रमुख व्यवसाय असून येथे कापूस, सोयाबीन आणि भाजीपाला पिकासह शेतकरी मोठ्या प्रमाणात ऊस लागवड करतात. येथील राजकारण सुद्धा ऊस, साखर कारखाना आणि त्याच्या अवतीभवती फिरते. त्यामुळे या मतदारसंघाचे राजकारण बहुतांशवेळा साखर कारखानदारीला धरूनच असते.

काँग्रेसने ८ वेळा जींकली निवडणूक -

1962 पासून या मतदारसंघात सर्वाधिक आठ वेळा काँग्रेसचे आमदार जिंकले आहेत. भाजपचे उमेदवार 1995, 2004 आणि 2014 साली मतदारसंघातून निवडले गेले आहेत. 1967 आणि 1972 साली या मतदारसंघांमध्ये माजी आमदार शंकरराव माने वगळता कुणालाही मतदारांनी दुसऱ्यांना पसंती दिली नाही. दरवेळी मतदारांनी भाकरी फिरवावी तसा उमेदवार बदलला आहे.

उमरखेड विधानसभा मतदारसंघात 1962 ते 1985 पर्यंत काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला गेला. नंतर मात्र 1990 साली जनता दलाचे चक्र मतदारसंघात फिरले आणि तेव्हापासून या मतदारसंघात वेगवेगळ्या पक्षाच्या उमेदवारांना मतदारांनी पसंती दिली. उमरखेड विधानसभा मतदारसंघाचा इतिहास पाहता, 1962 झाली काँग्रेसचे रामचंद्र शिंगनकर हे मतदारसंघाचे पहिले आमदार होते. त्यानंतर 1967 आणि 1972 साली शंकरराव माने हे सलग दोन वेळा या मतदारसंघात जिंकणारे पहिले आमदार होते.

त्यानंतर 1978 मध्ये काँग्रेसचे अनंतराव देवसरकर आणि 1980 मध्ये त्रिंबकराव देशमुख आणि 1985 साली भीमराव देशमुख हे काँग्रेसचे आमदार म्हणून जिंकून आले. मात्र, 1990 च्या विधानसभा निवडणुकीपासून मतदारसंघात चुरशीच्या लढती होत गेल्या. 1990 साली येथे जनता दलाचे प्रकाश पाटील देवसरकर यांनी विजय मिळवला, तर 1995 मध्ये भाजपने पहिल्यांदा येथे कमळ फुलवले. त्यावेळी भाजपचे उत्तमराव इंगळे यांनी काँग्रेसचे अॅड. अनंतराव देवसरकर यांचा पराभव केला होता. या नंतर 1999 साली काँग्रेसचे अॅड. अनंतराव देवसरकर हे पुन्हा आमदार झाले. त्यावेळी देवसरकर यांना 40 हजार 668 मते मिळाली होती, तर भाजपचे उत्तमराव इंगळे यांना 32 हजार 878 एवढी मते मिळाली होती. राष्ट्रवादीचे प्रकाश पाटील देवसरकर यांना यावेळी 37 हजार 190 मते मिळाली होती.

1995 नंतर पुन्हा 2004 मध्ये भाजपचे उत्तमराव इंगळे यांना जनतेने साथ दिली. 2009 च्या विधानसभा निवडणुकीत उमरखेडच्या मतदारांनी काँग्रेसचे विजयराव खडसे यांना साथ दिली. त्यावेळी विजयराव खडसे यांनी भाजपचे राजेंद्र नजरधने यांचा पराभव केला. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा मतदारसंघात भाजपचे कमळ फुलले. त्यावेळी भाजपचे राजेंद्र नजरधने यांनी काँग्रेसच्या विजय खडसे यांचा पराभव केला. राजेंद्र नजरधने यांना 90190 मते , काँग्रेसचे विजयराव खडसे यांना 41616 मते, राष्ट्रवादीचे मोहन मोरे यांना 19047 मते, शिवसेनेचे शिवशंकर पांढरे यांना 24616 मते मिळाली होती.

विकासाच्या मुद्द्यावर होणार निवडणूक-

यंदाच्या विधानसभा निवडणुकीत कुठल्या पक्षाचा कोण उमेदवार राहील याची सर्वांना उत्सुकता लागली आहे. अनेक जण तिकीट मिळावे म्हणून इच्छुक आहेत. त्यासाठी मागच्या पाच वर्षांत अनेकांनी जनतेच्या संपर्कात राहून जनतेच्या कामाचा सपाटा लावला आहे. वेगवेगळ्या समस्यांसाठी आंदोलने केली आहेत. येथे भरघोस इच्छुकांची संख्या लक्षात घेता विधानसभा निवडणूक चुरशीची होणार अशी अपेक्षा आहे. असे असले तरी यंदाची निवडणूक ही विकासाच्या मुद्द्यावर होईल असे राजकीय विश्लेषक सांगतात.

मतदारसंघातील राजकारण पोफळीच्या वसंत सहकारी साखर कारखान्यावर -

मतदारसंघातल्या सर्वाधिक 30 हजार लोकांना प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष रोजगार उपलब्ध करून देणारा कामधेनु पोफळीचा वसंत सहकारी साखर कारखाना बंद पडल्याने शेतकऱ्यांचं अर्थचक्र कोलमडलं आहे. उमरखेड लगतच्या पाच ते सहा तालुक्यातील नागरिक पोफळीच्या वसंत सहकारी साखर कारखान्यावर अवलंबून होते. मागील तीन वर्षांपासून साखर कारखान्याची चाके फिरली नाहीत. त्यावर बहुतांश जनतेची उमेद होती. तोच साखर कारखाना बंद असल्याने या भागाची रौनकच गेली आहे. या कारखान्यावर अवलंबून असलेले मजूर, कामगार यासर्वांची अर्थ व्यवस्था आता कोलमडली आहे. येथील साखर कारखाना बंद असला तरी त्या बंद कारखान्याभोवती उमरखेडचं राजकारण फिरते आहे.

पैनगंगा अभयारण्या लगतच्या गावात विकास कामाचा अभाव -

मतदारसंघातील अनेक गावे पैनगंगा अभयारण्यात लगतच्या भागात येतात. हा भाग येथे "बंदीभाग" म्हणून ओळखला जातो. रस्ते, वीज, पाणी, आरोग्य आणि शिक्षण या मूलभूत सुविधाही येथील जनतेला नीट मिळत नाहीत. त्यामुळे येथील नागरिकांच्या मनांत आजही रोष पाहायला मिळतो. बंदीभागासह इतर ग्रामीण भागात तर आरोग्याच्या सुविधा मिळत नसल्याने त्यांना उपचारासाठी नांदेड गाठावे लागते. बंदीभागात रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय आहे. विकासापासून वंचित असलेले मतदार विशेषतः तरुण पिढीच्या हाताला काम नाही, शिक्षणाची योग्य सुविधा नाही, आरोग्य सुविधा नाही. सर्वात महत्वाचं म्हणजे त्यांची कैफियत ऐकणारा आणि त्यांना अडचणीतून दिलासा देणारेही कोणी नाही.

मतदारसंघात पाणी टंचाई -

पैनगंगा नदीकाठच्या अनेक गावात उन्हाळ्यात तीव्र पाणी टंचाई पाहायला मिळते. यामध्ये चातारी, चिंचोली, सावळेश्वर, विडुळ आणि मुरली यासारख्या अनेक गावांना नेहमी उन्हाळ्याच्या दिवसात भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. चातारी गावात तर घरांच्या छतावरून विजेची तार जावी तशी मोठी पाण्याची पाईपलाईन दिसते. मात्र, त्याला नीट पाणीच मिळत नाही.

उच्च शिक्षणाची संधी उपलब्धनाही -

उच्च शिक्षणाची संधी इथे फार उपलब्ध नाही. त्यामुळे शिक्षण झालेल्या अनेक तरुण पिढ्या नांदेड आणि लगतच्या हिंगोली, औरंगाबाद भागात उच्चशिक्षणासाठी जाताना दिसतात.

आज विद्यमान आमदार राजेंद्र नजरधने यांच्यासोबत पूर्वीसारखी भाजपची टीम उभी असल्याचे दिसत नाही. उमरखेड नगर परिषदेमध्ये स्वीकृत नगरसेवक असलेले नितीन भुतडा हे नुकतेच भाजपचे जिल्हाध्यक्ष झाले आहेत. त्यांचे आणि आमदार राजेंद्र नजरधने यांच्यात पहिल्या सारखे सौख्य नसल्याचे बोलले जात आहे. मागील पाच वर्षात भाजपचे अनेक निष्ठावंत कार्यकर्ते दुरावले गेल्याने आमदारांच्या समर्थकांच्या तुलनेत विरोधकांची संख्या वाढली आहे.उमरखेड विधानसभा वेगळी असली तरी राष्ट्रवादीचे मनोहर नाईक यांना मानणारा मोठा वर्ग या भागात आहे. अशावेळी मनोहरराव नाईक यांची भक्कम साथ कुणाच्या बाजूने राहील यावरही उमेदवाराचं भवितव्य ठरणार आहे.

उमरखेड मतदारसंघात माजी आमदार उत्तम इंगळे यांचा मोठा चाहता वर्ग आहे. भाजपा नव्याने झालेले जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा या दोघांची विद्यमान आमदार राजेंद्र नजरधने यांना कितपत साथ मिळते यावर बरंच काही अवलंबून राहणार आहे. दुसरीकडे काँग्रेसचे नेते आणि माजी आमदार विजय खडसे यांनी मागील काही वर्षात विरोधकांनाही आपल केलं असून आज त्यांच्या सोबतीला माजी आमदार आणि याभागातील किती जिल्हा परिषद सदस्य खंबीरपणे उभे राहतात यावर बरंच काही अवलंबून राहणार आहे.

विडुळ भागातील जिल्हा परिषद सदस्य राम देवसरकर आणि मुळावा भागातील माजी जिल्हा परिषद सदस्य तातू देशमुख आणि माजी आमदार अनंतराव देवसरकर यांचे बळ कोणाच्या बाजूने राहील यावर काँग्रेसच्या उमेदवाराचे भविष्य ठरणार आहे. सध्या उमरखेडमध्ये काँग्रेसचे माजी आमदार विजय खडसे यांच्यासह प्राचार्य मीनाक्षी सावरकर, गजानन कांबळे, किशोर भवरे, उत्तम आडे आणि डॉ गायकवाड आदी इच्छुक काँग्रेसच्या तिकीटाच्या प्रतिक्षेत आहेत. दुसरीकडे भाजपमध्ये विद्यमान आमदार राजेंद्र नजरधने यांच्यासह उमरखेडचे नगराध्यक्ष महादेव ससाने, भाजपचे भाविक भगत, प्रा मोहन मोरे यांची नावे चर्चेत आहेत. तसंच रिपाईचे महेंद्र मानकर यांचेही नाव चर्चेत आहे. शिवसेनेचे डॉ. विश्वनाथ विणकरे हे सुध्दा मागील पाच वर्ष जनतेच्या संपर्कात असून ते सुद्धा निवडणूक लढण्याच्या तयारीत आहेत. तर वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रमोद दुधळे आणि मिलिंद धुळे या सर्वांची नावे सध्या मतदारसंघात चर्चेत आहेत.

मागच्या 47 वर्षाच्या इतिहासात उमरखेड विधानसभा निवडणूक कुठल्याही आमदाराला दुसऱ्यांदा सलग जिंकता आली नाही. त्यामुळे यंदा भाजप आणि काँग्रेसचे कुणाला टिकीट मिळते हा उत्सुकतेचा विषय आहे. आमदार रिपीट न करणाऱ्या जनतेसमोर भाजपा आणि काँग्रेस कुठले पर्याय ठेवतात आणि उमरखेडची जनता कोणाच्या बाजूने उभी राहते हे पाहणेही महत्वाचे ठरणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details