यवतमाळ- आर्णी बायपासवर तीन ट्रकचा भीषण अपघात झाला. यात एका चालकाचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा चालक गंभीर जखमी झाला आहे. अपघात कमी व्हावे, म्हणून रस्ते विस्तारीकरणाचे काम जोरात सुरू आहे. परंतु, हेच रस्ते विचित्र अपघाताला कारणीभूत ठरते आहे.
यवतमाळमध्ये तीन ट्रकचा भीषण अपघात; एक चालक जागीच ठार, दुसरा गंभीर
आर्णी बायपासवर तीन ट्रकचा भीषण अपघात झाला. यात एका चालकाचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा चालक गंभीर जखमी झाला आहे.
चंद्रभान गोविंद विश्वकर्मा (३५, रा. उदयपुरा, मध्यप्रदेश), असे या अपघातात जागीच ठार झालेल्या ट्रकचालकाचे नाव आहे. या अपघातात सुनील आदित्यसिंग ठाकूर (३८, रा. श्रीरामपूर) हा दुसऱ्या ट्रकचा चालक गंभीर जखमी झाला. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला नागपूर येथे उपचारासाठी हलविण्यात आले आहे. कोळसा वाहून नेत असलेला ट्रक आर्णी मार्गावरून बायपासमार्गे यवतमाळ शहराकडे येत होता. दरम्यान, विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकला त्याने समोरासमोर जोरदार धडक दिली. त्यानंतर मागाहून येत असलेला टिप्पर त्या ट्रकवर जाऊन आदळला. या विचित्र अपघातात तिन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
ही घटना स्थानिकांच्या लक्षात येताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच ट्रकच्या केबीनमध्ये दबून मृत्यू झालेल्या चंद्रभान विश्वकर्मा याला आणि गंभीर जखमी झालेल्या सुनील ठाकूर या दोघांना बाहेर काढले. सुनील ठाकूर याला उपचारासाठी येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. घटनेची माहिती अवधूतवाडी पोलिसांना देण्यात आली. त्यावरून पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. तोवर मार्गावरील वाहतूक मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली होती. रस्त्याच्या दुतर्फा शेकडो वाहनांची रांग लागली होती. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला आहे.