महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यवतमाळमध्ये नाकाबंदीत ३६ लाखांची रोकड जप्त

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यवतमाळ जिल्ह्यात नाकाबंदीदरम्यान ३६ लाखांची रोकड जप्त करण्यात आली असुन आर्म्स अॅक्ट अतंर्गत २७ गुन्ह्यांची नोंदही करण्यात आली आहे.

By

Published : Apr 9, 2019, 7:58 PM IST

जप्तीची माहिती देताना पोलीस

यवतमाळ - लोकसभा निवडणूक शांततेत पार पडावी, यासाठी जिल्हा पोलीस दलाकडून विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. त्याअंतर्गत नाकाबंदीदरम्यान ३६ लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. तर आर्म्स अॅक्टच्या २७ गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.

जप्तीची माहिती देताना पोलीस अधिकारी

येथे गुरुवारी (दि.११ एप्रिल) मतदान घेण्यात येणार असून, बुधवारी (दि. १० एप्रिलला) पोलिस कर्मचारी नेमून दिलेल्या मतदान केंद्रांवर दाखल होणार आहे. संवेदनशील केंद्रांवर अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. याअंतर्गत २ हजार ४०० पोलीस कर्मचारी, ३०० पोलीस अधिकारी बंदोबस्तासाठी हजर राहणार आहेत. यापैकी ५५ अधिकारी दुसऱ्या जिल्ह्यातून बंदोबस्तासाठी मागवण्यात आले आहेत. रेल्वे पोलीस, (एसआरपीएफ) स्टेट रिझर्व्ह पोलीस फोर्सचाही यात समावेश राहणार आहे.

निवडणुकीचे वातावरण लक्षात घेता जिल्ह्यातील पोलीस ठाण्यात बैठका घेऊन संबधित ठाणेदारांना योग्य ती खबरदारी घेण्याचे निर्देशही जिल्हा पोलीस प्रमुखांकडून देण्यात आले आहेत. तर पोलीस ठाण्यात २० टक्के अतिरिक्त कर्मचारी राहतील. त्यामुळे नियमित कामकाज सुरळीतपणे पार पडणार असल्याचा विश्वास पोलीस विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे. जिल्हाभरात निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर विविध ठिकाणी नाकाबंदी करून वाहनांची तपासणी करण्यात आली. पोलीस व महसूल खात्याच्या संयुक्त पथकाने १३ लाख २० हजार तर, पोलीस पथकाने २३ लाख, अशी एकूण ३६ लाख २० हजारांची रोकड आत्तापर्यंत जप्त करण्यात आली आहे.

आचारसंहिता उल्लंघनाचे सात गुन्हे

यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघात आचारसंहिता उल्लंघनाचे सात गुन्हे नोंद करण्यात आले असून त्यात लोहारा-दोन, अवधूतवाडी-दोन, वणी, दिग्रस, बाभूळगाव येथे प्रत्येकी एका गुन्ह्याची नोंद आहे. गुन्हे दाखल झालेल्यांमध्ये ‘प्रहार’चे आमदार बच्चू कडू, वंचित बहुजन आघाडीचे अ‍ॅड. बाळासाहेब आंबेडकर, राम लोखंडे, सुनील नटराजन उर्फ प्रेमासाई महाराज यांचा समावेश आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details