महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

रहीमभाईंचे पक्षीप्रेम : ट्रकचा हॉर्न वाजताच जमतात शेकडो कावळे

माणसांपासून कायम लांब असणाऱ्या कावळ्यांचा थवा चक्क 'हॉर्न'चा आवाज ओळखून ट्रकचा पाठलाग करतात. हे कावळे दररोज रहीमभाईच्या येण्याची वाट बघतात. दररोज चालणाऱ्या या नित्यक्रमातून माणूस आणि कावळ्यांच्या मैत्रीचे अनोखे दर्शन गेल्या 15 वर्षांपासून स्थानिक लोक अनुभवत आहेत.

यवतमाळ
यवतमाळ

By

Published : Jan 5, 2021, 4:56 PM IST

यवतमाळ- सकाळी सात वाजताची वेळ. यवतमाळवरून नेरकडे येणाऱ्या (एम.एच 30 बी 2055) क्रमांकाच्या ट्रकचा भोंगा (हॉर्न) वाजताच शेकडो कावळ्यांच्या थवा अचानक त्या ट्रकवर येऊन बसतो. भुकेने व्याकूळ असलेले शेकडो कावळे दाण्यासाठी अक्षरशः जणू अंगा खांद्यावर खेळतात. माणसांपासून कायम लांब असणाऱ्या कावळ्यांचा थवा चक्क 'हॉर्न'चा आवाज ओळखून ट्रकचा पाठलाग करतात. हे कावळे दररोज रहीमभाईच्या येण्याची वाट बघतात. दररोज चालणाऱ्या या नित्यक्रमातून माणूस आणि कावळ्यांच्या मैत्रीचे अनोखे दर्शन गेल्या 15 वर्षांपासून स्थानिक लोक अनुभवत आहेत.

यवतमाळ

रहीमभाईची पंधरा वर्षांपासून कावळ्यांशी मैत्री

यवतमाळच्या कळंब चौकातील मिर्झा रहीम बेग यांचा गेल्या पंधरा वर्षांपासून वाहतुकीचा व्यवसाय आहे. यवतमाळ-नेर रस्त्यावर त्यांची गाडी धावत आहे. रोज सकाळी 6 वाजता यवतमाळ येथून माल घेऊन त्यांचा ट्रक नेरकडे निघतो. यवतमाळ ते नेर दरम्यान एकदम मधोमध मालखेड शिवारासमोर उंच टेकड्यावर रहीम भाईंचा ट्रक येतो तेव्हा शेकडो कावळ्यांचा थवा त्यांच्या ट्रकाचा पाठलाग करतात. रहीमभाईचा ट्रक वेगाने निघून जातो तेव्हा ते कावळेही क्षणभर सैरभैर होऊन ट्रकचा पाठलाग करू लागतात. हा प्रकार काही एके दिवसाचा नसून गेल्या पंधरा वर्षांपासून दररोज चालत आलेला आहे.

रहीमभाई आणि कावळ्यांची मैत्रीच

यवतमाळ-अमरावती रस्त्यावर शेकडो वाहने धावत असताना नेमके त्याच ठिकाणी रोज जेव्हा नियमित वेळेत रहीमभाईंचा ट्रक येतो. तेव्हा त्यांच्या गाडीच्या हॉर्नचा आवाज एकून असंख्य कावळे जमा होतात. पक्षीप्रेमी असलेले रहीमभाई दररोज त्यांना घरून खिचडी बनवून आणतात तर कधी, शेव, पापडी, बिस्कीट. खाऊ काढेपर्यंत लहान मुलांप्रमाणेच कावळ्यांनाही धीर नसतो. काही वेळेस तर त्यांच्या हातातून खाऊ ओरबाडून पळतात. अवघ्या काही मिनिटात आणलेला खाऊ संपतो. चक्क त्यांच्या अंगा खांद्यावर कावळ्यांच्या थवा खेळताना अनेकांनी अनुभवला आहे.

माणसांनी पक्षापासून शिकायला हवे

रहीमभाई आणि कावळ्यांचा हा मुकसंवाद मानवी भावनांचा एक नवा उत्सव असतो. हा उत्सव गेल्या पंधरा वर्षांपासून सुरू आहे. जाती-धर्माच्या भिंतीत अडकलेल्या माणसांनी या पक्षांपासून काही तरी शिकायला हवे. ही उडती पाखरे का जीव लावत असतील रहीमभाईंवर. कोणते नाते असेल त्यांचे. सारेच प्रश्न मनाच्या आकाशात घिरट्या घालत असतात. माणसाला होता आले तर त्याने पक्षी व्हावे. पक्ष्यांना जात नसते. धर्म नसतो ते मुक्तपणे कवेत घेत असतात मंदिर अन् मशिदीला.

ABOUT THE AUTHOR

...view details