यवतमाळ : रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार करणारी टोळी कळंब येथे गजाआड करण्यात आली. या प्रकरणी कळंब येथील एक डॉक्टर, औषध विक्रेत्यासह चार जणांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याजवळून 9 इंजेक्शनसह दोन लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. डॉ. अक्षय तुंडलवार, सावन पवार, सौरव मोगरकर, बिलकिस बानो असे ताब्यात घेण्यात आलेल्या चौघांची नावे आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक पथक, कळंब पोलीस ठाणे यांची असून जप्त केलेले इंजेक्शन शासकीय साठ्यातील असल्याची माहिती समोर येत आहे.
यवतमाळमध्ये रेमडेसिवीरचा काळाबाजार करणारी टोळी गजाआड सापळा रचून केले जेरबंदजिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालल्याने रेमडेसिवीर या इंजेक्शनचा तुटवडा पडू लागला होता. याचाच फायदा घेत या इंजेक्शनची साठेबाजी करून काळाबाजार सुरू झाला होता. याचा शोध घेण्यासाठी पोलीस अधीक्षक यांनी पथक नेमले होते. या पथकाला गुप्त माहिती मिळाली की कळंब येथील औषध विक्रेता सावन पवार हा नागपूर रोडवरील बायपासवर हे इंजेक्शन अवैधरित्या विक्री करणार आहे. त्यावरून सापळा रचून रंगेहात त्याला पकडण्यात आले. त्याची कसून चौकशी केली असता घटनास्थळी हजर असलेला डॉ. अक्षय तुंडलवार यांनी इंजेक्शन मला दिल्याची कबुली त्याने दिली. डॉक्टर तुंडलवार यांना पोलिसी खाक्या दाखवत अधिक विचारपूस केली असता इंजेक्शन कळंब येथील कोविड केअर सेंटरमध्ये काम करणाऱ्या सौरव मोगरकर यांच्या माध्यमातून यवतमाळ येथील जाजू चौकात राहणाऱ्या बिलकीस बानो या महिलेने दिल्याचे सांगितले.
महिलेच्या घरून सहा इंजेक्शन जप्तपोलिसांनी या महिलेच्या घराची झडती घेतली असता सहा रेमडेसिवीर इंजेक्शन आढळून आले. असे एकूण 9 रेमडेसिवीर इंजेक्शन, मोबाईल, दुचाकी असा एकूण दोन लाख पाच हजारांचा मुद्धेमाल या कारवाईत जप्त करण्यात आला. या चौघांविरुद्ध विविध कायद्यांतर्गत कळंब पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.