यवतमाळ- यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदार संघामध्ये ऐन निवडणुकीच्या २ दिवसांपूर्वी महाआघाडीत 'बिघाडी' आली आहे. प्रचारात काँग्रेसचे उमेदवार माणिकराव ठाकरे हे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेत नसल्याने कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे, असे राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष संदीप बाजोरीया यांनी सांगितले. यामुळे महाआघाडीमध्ये असलेला वाद समोर आला आहे.
महाआघाडीत बिघाडी : कार्यकर्ते माझं ऐकत नाही; राष्ट्रवादी प्रदेश उपाध्यक्षांचा गौप्यस्फोट
यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदार संघामध्ये ऐन निवडणुकीच्या २ दिवसांपूर्वी महाआघाडीत 'बिघाडी' आली आहे.
मी २००९ पासून काँग्रेसचे विजय दर्डा यांच्यासह मणिकराव ठाकरे यांना रसद पुरवण्याचे काम केले. मी स्वत: आघाडी धर्म पाळणार आहे. मात्र, कार्यकर्ते माझे ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत. असा गौप्यस्फोट संदीप बाजोरीया यांनी केला आहे. माणिकराव ठाकरे हे तालुक्यात व गावात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगसेवक वा पदाधिकारी यांना डावलत आहेत. कुठल्याही रॅलीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी यांना बोलावत नाहीत. उलट विरोधकांना सोबत घेऊन ते प्रचार करत आहेत, असा आरोपही बाजोरिया यांनी केला आहे.
बाजोरीया यांनी केलेल्या गौप्यस्फोटामुळे यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात खळबळ उडाली आहे. या सर्व प्रकरणामुळे माणिकराव ठाकरे यांच्या मतांवर परिणाम होणार आहे. त्यामुळे ठाकरे चांगलेच अडचणीत सापडले आहेत.