यवतमाळ- काल रात्री जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. यामुळे, पणन महासंघ आणि सीसीआयने खरेदी केलेला जिनिंगमधील कापूस पावसाने ओला झाला आहे. त्यामुळे, कापसाची प्रत घटन्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, हवामान खात्याने जिल्ह्यात अवकाळी पावसाची संभावना वर्तवली होती. मात्र, तरी देखील पणन आणि सीसीआयने या माहितीची दखल घेतली नाही. सीसीआयच्या हलगर्जीपणानेच कापूस ओला झाल्याचे समजले आहे.
यवतमाळ येथील कापूस खरेदी केंद्रावर मागील आठ दिवसापासून मोठ्या प्रमाणात कापसाची आवक वाढली होती. दरम्यान, पणन महासंघ आणि सीसीआयने ५ लाख २३ हजार क्विंटल कापसाची खरेदी केली होती. त्यामुळे, कापूस खरेदी केंद्रावरील जिनिंगमध्ये कापूस ठेवण्यासाठी जागा नसल्याने २९ फेब्रुवारीपासून कापूस खरेदी बंद करण्यात आली होती. मात्र, बहुतांश कापूस उघड्यावर होता. तो झाकण्यासाठी कापूस खरेदी केंद्राला पुरेसा वेळ मिळाला नाही. त्यामुळे, अवाकाळी पावसामुळे पणनचा आणि सीसीआयचा कापूस आणि काही प्रमाणात सरकी ओली झाली.